Char Dham Yatra: ‘उत्तराखंड’मध्ये अडकले कोल्हापूरचे भाविक, नव्या यात्रेकरूंची नोंदणी रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 02:04 PM2022-05-17T14:04:43+5:302022-05-17T14:05:19+5:30
एरवी हरिद्वारहून ऋषिकेशला जाण्यासाठी दीड तास पुरत असे. परंतु आता ५ ते ६ तास लागत आहेत.
कोल्हापूर : ‘उत्तराखंड’मधील चारधाम यात्रेसाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे या परिसरातील नियोजन कोलमडले आहे. अनेक हॉटेल्सचालकांनी खोल्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढवले आहेत. रस्त्यावर भाविकच भाविक असल्याने गर्दी पुढेच सरकत नसल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून मे महिनाअखेरीपर्यंतची नवी नोंदणी बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरातून या यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. एरवी हरिद्वारहून ऋषिकेशला जाण्यासाठी दीड तास पुरत असे. परंतु आता ५ ते ६ तास लागत आहेत.
उत्तराखंडमधील बद्रीनाथ, केदारनाथ, यमनोत्री आणि गंगोत्रीला जाऊन चारधाम यात्रा करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडच्या पर्यटन विभागाच्या वतीने ऑनलाईन तसेच हरिद्वार आणि ऋषिकेश या ठिकाणी नोंदणीही करण्यात येते. ६ मेपासून या यात्रांना सुरुवात झाली. चारधामसाठी जाण्यासाठी नोंदणी आवश्यक असल्याने नागरिक प्रतीक्षेत आहेत.
अनेक भाविक अडकले
थेट हरिद्वार किंवा ऋषिकेश येथे जाऊन नोंदणी करण्यासाठी हजारो भाविक आले आहेत. परंतु वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यटन विभागाने आता चारधामसाठीची नोंदणी बंद केली आहे. २७ मेपर्यंतची नोंदणी बंद केल्याने आता तोपर्यंत या भाविकांना या दोन शहरांमध्येच मुक्काम करावा लागणार आहे किंवा परत जावे लागणार आहे.
एका खोलीसाठी १० हजार रुपये
केदारनाथ येथे राहण्यासाठी मोठ्या सुविधा नाहीत. त्या मर्यादित आहेत आणि भाविकांची संख्या मात्र वाढली आहे. त्यामुळे एक रात्र राहण्यासाठी एका खोलीला १० हजार रुपयांचा दर सांगितला जात आहे आणि भाविक पर्याय नसल्याने तो स्वीकारत आहेत. केदारनाथ येथे दर्शनाची रांग तीन किलोमीटरपर्यंत गेल्याचे सांगण्यात आले.
सन केदारनाथ दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या
२०१९ ९ लाख २६ हजार
२०२० २ लाख २० हजार
२०२१ २ लाख ४२ हजार
२०२२ १ लाख ३२ हजार (७ दिवसात)
कोरोना संपल्याने मोठ्या संख्येने भाविक चारधाम यात्रेसाठी येत आहेत. परंतु नोंदणी बंद केली आहे. नोंदणी बंद करताना थेट आलेल्या भाविकांचे काय करायचे, याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. - रवी सरदार, अध्यक्ष, टुर ऑपरेटर्स असोसिएशन