राजर्षी शाहूंचे चरित्र आता रशियन, चिनी भाषांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 12:10 AM2016-11-14T00:10:02+5:302016-11-14T00:10:02+5:30
जयसिंगराव पवार यांची माहिती
कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती यांचे चरित्र आता रशियन आणि चिनी या भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे संस्थापक-संचालक व मूळ मराठी ग्रंथाचे लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ही माहिती दिली.
डॉ. पवार म्हणाले, २००१ साली प्रसिद्ध झालेले शाहू चरित्र कानडी, कोकणी, उर्दू, तेलगू, हिंदी, इंग्रजी व जर्मन अशा देशी-विदेशी भाषांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. एकूण १४ भारतीय भाषांत व १० विदेशी भाषांत शाहू ग्रंथ प्रकाशित करण्याचा संस्थेचा मानस आहे. याचाच एक भाग म्हणून सामाजिक कार्यकर्त्या व
रशियन भाषातज्ज्ञ डॉ. मेघा पानसरे व आणखी एक रशियन भाषातज्ज्ञ प्रा. तत्याना बीकवा यांनी शाहू चरित्राचा रशियन भाषेत अनुवाद केला आहे.
डॉ. पानसरे या शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख असून, त्यांनी रशियन भाषेतील अनेक प्रकारचे साहित्य मराठी भाषेत अनुवादित केले आहे. प्रा. बीकवा या मूळच्या सेंट पीटसबर्ग येथील असून, त्या अनेक वर्षे भारतात वास्तव्यास होत्या. रशियन भाषाशिक्षिका म्हणून त्या कऱ्हाड येथे कार्यरत होत्या. त्या आता रशियाला वास्तव्य करीत असून, त्यांनी आणि मेघा पानसरे यांनी केलेल्या रशियन अनुवादाचा शाहू ग्रंथ लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. प्रा. ओ ताई ली या मूळच्या चीनमधील असून, फ्रान्समध्ये त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले, तर त्यांचे पदव्युत्तर शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. १८ वर्षे इंग्लंडमध्ये शैक्षणिक कार्य केल्यानंतर त्या सध्या पुण्यात चिनी भाषातज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इंग्रजीतील शाहू चरित्र वाचल्यानंतर प्रभावित होऊन ते चिनी भाषेत भाषांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्या गेले दोन दिवस कोल्हापुरात आल्या असून, त्यांनी शाहू जन्मस्थळापासून महाराजांशी संबंधित सर्व स्थळांना भेटी दिल्या आहेत. हे भाषांतराचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला संस्थेचे विश्वस्त सुरेश शिपूरकर, मेघा पानसरे, प्रा. ओ ताई ली, प्रा. मंजूश्री पवार, विजय शिंदे उपस्थित होते.
शाहूंचे कार्य प्रेरणादायी
महाराजांवरील ग्रंथ वाचल्यानंतर मी प्रभावित झाले. त्यांनी शिक्षण, रोजगार, उद्योग, समतेसाठी जे काम करून ठेवलं आहे, ते खरंच प्रेरणादायी आहे. यातूनच मी त्यांच्या चरित्राचे चिनी भाषेत भाषांतर करण्याचा निर्णय घेतला.
प्रा. ओ ताई ली,
चिनी भाषांतरकार