कारागृह अधिकाऱ्याच्या निवासस्थानी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:01 AM2019-03-19T11:01:30+5:302019-03-19T11:03:12+5:30

कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधिकाऱ्याच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील १२ तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि एलईडी टीव्ही असा सुमारे पाच लाख किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याचे रविवारी उघडकीस आले. महिन्यापूर्वी याच वसाहतीमध्ये महिला सुरक्षा रक्षकाच्या घरी चोरी झाली होती.

Charge at the prison officer's house | कारागृह अधिकाऱ्याच्या निवासस्थानी चोरी

कारागृह अधिकाऱ्याच्या निवासस्थानी चोरी

Next
ठळक मुद्देकारागृह अधिकाऱ्याच्या निवासस्थानी चोरी१२ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पाच लाख किमतीचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधिकाऱ्याच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील १२ तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि एलईडी टीव्ही असा सुमारे पाच लाख किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याचे रविवारी उघडकीस आले. महिन्यापूर्वी याच वसाहतीमध्ये महिला सुरक्षा रक्षकाच्या घरी चोरी झाली होती.

अधिक माहिती अशी, महादेव दशरथ होरे (वय ३४, रा. पिंपळवाडी, ता. पराडा, जि. उस्मानाबाद) हे कळंबा कारागृहात तुरुंग अधिकारी म्हणून नुकतेच रूजू झाले आहेत. कारागृहाच्या समोर असलेल्या अधिकारी निवासस्थान रूम नंबरमध्ये एकमध्ये ते राहतात. १५ मार्चला ते शासकीय कामानिमित्त रायफल आणि काडतुसे जमा करण्यासाठी ते पुण्याला गेले होते. रविवारी दुपारी घरी आले असता त्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य दरवाजाची कडी-कोयंडा उचकटून कुलूप तोडलेले दिसून आले.

बेडरूममधील कपाटातील साहित्य विस्कटलेले होते. त्यातील सोन्याचे लॉकेट, पाटल्या, कानातील डुल, अंगठी, बदाम, गंठण असे बारा तोळे सोन्याचे दागिने, चांदीचा करंडा, गणपती मूर्ती, लहान बोळ, पैंजण, जोडवी आणि एलईडी टीव्ही असा सुमारे पाच लाख किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले. होरे यांनी जुना राजवाडा पोलिसांना वर्दी दिली. पोलीस निरीक्षक संभाजी जाधव सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी आले.

श्वानाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते परिसरातच घुटमळले. शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरटा हा परिसरातील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महिन्यापूर्वी याच वसाहतीमध्ये महिला सुरक्षा रक्षक संगीता दत्तात्रय चव्हाण यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ६० हजार रोकड, सोन्याच्या दोन रिंगा, चांदीचा करंडा, दोन छल्ले, असा सुमारे ७० हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. कळंबा कारागृहाच्या अधिकारी, कर्मचारी वसाहतीमध्ये घरफोडीच्या प्रकाराने येथील कुटुंबीयांच्यात भीती पसरली आहे.

कारटेप चोरीचा प्रयत्न

तुरुंग अधिकारी होरे यांच्या निवासस्थानासमोर कारागृह लिपिक जयंत मारुती शिंदे यांची सुमो (एम. एच. १४ डी. एक्स ०५२९) पार्किंग केली होती. चोरट्यांनी या गाडीचा मधला दरवाजा मोडून डॅश बोर्ड व कारटेप चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

कळंबा कारागृहाच्या समोरच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थाने आहेत. कोल्हापूर-गारगोटी रस्त्याकडेला ही वसाहत लागून असल्याने याठिकाणी भुरट्या चोरट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. कर्मचारी रात्रड्युटीवर गेल्यानंतर त्यांची घरे बंद असतात. याच संधीचा फायदा चोरटे घेत आहेत. या वसाहतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी येथील कुटुंबीयांनी केली आहे.
 

 

Web Title: Charge at the prison officer's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.