पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल, कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील घटना
By उद्धव गोडसे | Published: March 4, 2023 12:04 PM2023-03-04T12:04:49+5:302023-03-04T12:05:23+5:30
भाजपच्या नेत्यांनीही कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे अशा शब्दात कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली
उद्धव गोडसे
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याचा गुन्हा दाखल असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल झाले असून, सुनावणीसाठी कार्यकर्ते न्यायालयात फेऱ्या मारत आहेत. दुसरीकडे त्याच निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचे आरोप होऊनही गुन्हे दाखल झाले नाहीत, अशा तक्रारी आता भाजपचे कार्यकर्ते करीत आहेत.
पुण्यातील पोटनिवडणुकीत पैसे वाटण्याच्या तक्रारी झाल्यावर कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत गतवर्षी झालेल्या अशाच तक्रारीचे काय झाले, हे लोकमतने तपासले. एप्रिल २०२२ मध्ये झालेली ही पोटनिवडणूक मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोप-प्रत्यारोपांवरून राज्यभर चर्चेत आली. वारे वसाहत, पद्मावती मंदिर आणि सुतारवाडा येथे मतदारांना पैशांची पाकिटे वाटताना भाजपचे सहा कार्यकर्ते भरारी पथकाच्या हाती लागले. त्यांच्याकडून १ लाख २६ हजार ३० रुपये पथकाने जप्त केले होते. संशयितांवर जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. गुन्ह्याची चौकशी करून सहा जणांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, सुनावण्या सुरू आहेत.
याच निवडणुकीत काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शाहूपुरी आणि कसबा बावडा परिसरात मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप भाजपच्या नेत्यांनी केले. त्याबद्दल शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरला. मात्र, त्याची चौकशी झाली नाही आणि गुन्हेही दाखल झाले नाहीत. महाविकास आघाडीने सत्तेच्या बळावर केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्रास दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.
यांच्यावर आरोपपत्र दाखल
भाजपचे कार्यकर्ते अशोक शंकरराव देसाई (वय ५७, रा. फुलेवडी रिंगरोड, कोल्हापूर), विजय महादेव जाधव (वय ४८, रा. राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर), संतोष सदाशिव माळी (वय ४०, रा. मंगळवार पेठ), प्रवीण जयवंत कणसे (रा. भोसलेवाडी), जोतिराम तुकाराम जाधव (वय ४४, रा. घोरपडे गल्ली, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर) आणि गणेश देसाई यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे.
कार्यकर्त्यांची नाराजी
निवडणूक काळात मतदारांना नाही, तर निवडणुकीसाठी राबणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जेवण खर्चासाठी पैसे देत होतो. न्यायालयात सत्य समोर येईलच, पण अशावेळी भाजपच्या नेत्यांनीही कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अशा रकमा जप्त
पद्मावती मंदिर - ४५,५००
वारे वसाहत - ४०,५००
सुतार वाडा - ३९,५३०