Kolhapur- एएस ट्रेडर्स फसवणूक: लोहितसिंग सुभेदारसह पाच जणांवर आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 12:11 PM2023-12-19T12:11:02+5:302023-12-19T12:11:18+5:30
८७१ पानांचे आरोपपत्र, आजवर ३२ जणांवर गुन्हा, १२ जणांवर कारवाई
कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीचा प्रमुख लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (वय ४१, रा. पलूस, जि. सांगली) याच्यासह पाच संशयितांवर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी (दि.१८) जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ८७१ पानांच्या आरोपपत्रात संशयितांचे कारनामे नमूद केले आहेत. आजपर्यंत या गुन्ह्यातील एकूण १२ संशयितांवर आरोपपत्र दाखल झाले, तर ३२ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
आरोपपत्र दाखल झालेल्यांमध्ये सुभेदार याच्यासह प्रदीप कल्लाप्पा मड्डे (वय ४८, रा. लोणावळा, जि. पुणे), साहेबराव सुबराव शेळके (वय ६४, रा. जिवबानाना पार्क, कोल्हापूर), नामदेव जिवबा पाटील (वय ४९, रा. खोकुर्ले, ता. गगनबावडा) आणि दत्तात्रय विश्वनाथ तोडकर (वय ६४, रा. कोडोली, ता. पन्हाळा) यांचा समावेश आहे. यापूर्वी विक्रम जोतिराम नाळे, श्रृतिका वसंतराव सावेकर, सुवर्णा श्रीरंग सरनाईक, बाबासाहेब भूपाल धनगर, बाळासाहेब कृष्णात धनगर, अमित अरुण शिंदे आणि आशिष बाबासाहेब गावडे यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे, अशी माहिती तपास अधिकारी निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.
पुरावे नष्ट करण्याचा आरोप
शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच कंपनीचे संचालक आणि एजंट यांनी कार्यालयांमधील लॅपटॉप, हार्डडिस्क आणि अन्य कागदोपत्री पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या लाभातून मिळालेल्या मालमत्तांची विक्री केली. संशयितांनी कट रचून गुंतवणूकदारांची ४४ कोटी ४२ लाख ९६ हजार ९६ रुपयांची फसवणूक केल्याचा उल्लेख पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे.
आरोपींची संख्या वाढणार
गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीसह २७ जणांचा उल्लेख तक्रारदारांनी फिर्यादीत केला होता. पोलिसांच्या तपासात कंपनीचे आणखी काही संचालक, एजंट आणि प्रमोटर यांची नावे समोर येत आहेत. त्यानुसार संशयितांची संख्या वाढत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी काही एजंट रडारवर असल्याचे निरीक्षक कळमकर यांनी सांगितले.
तक्रारी द्या : पोलिसांचे आवाहन
सुमारे दीड हजार कोटींची फसवणूक झालेली असतानाही केवळ ४४ कोटी ४२ लाख रुपयांच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. या कंपनीवर गुन्हा दाखल होऊन एक वर्ष उलटले असून, यापुढे कोणतेही परतावे मिळणे शक्य नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रारी द्याव्यात, असे आवाहन तपास अधिकारी कळमकर यांनी केले आहे.