विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ अडवून विचारला जाब
By भीमगोंड देसाई | Published: December 13, 2023 11:28 PM2023-12-13T23:28:34+5:302023-12-13T23:29:58+5:30
राधानगरी तालुक्यातील अनुभव : सरकार भारताचे की मोदींचे अशा प्रश्नांचा भडिमार
भीमगोंडा देसाई, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली गावात केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ बुधवारी अडवण्यात आला. संविधान संवाद समितीचे राज्य सचिव राजवैभव शोभारामचंद्र यांनी भारत की मोदींचे सरकार, शासकीय खर्चातून मोदी आणि भाजपचा प्रचार का, अशा प्रश्नांचा भडिमार करत रथाचे समन्वयक अजित वागरे यांना चांगलेच धारेवर धरले. ते निरूत्तर झाले.
राजवैभव यांनी यात्रेच्या उद्देशावरच गंभीर असे प्रश्न उपस्थित केला. जनतेच्या पैशातून यात्रेवर रोज २५ हजार रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. या घटनेचा व्हिडीओही दुपारनंतर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
केंद्र शासन राज्य शासनाच्या सहकार्याने विविध शासकीय योजनांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम राबवत आहे. या मोहिमेची सुरुवात शनिवारपासून झाली आहे. यात्रेचा प्रचार रथ बुधवारी सोन्याची शिरोली येथे पोहोचला. तेथील ग्रामसेवकांनी निमंत्रित केलेल्या ग्रामस्थांच्या हातात योजनांचे फलक होते.
एका वाहनावरील स्क्रीनवर उज्ज्वला गॅससह विविध योजनांची माहिती दिली जात होती. यामध्ये मोदींच्या योजना असे अनेक ठिकाणी होते. यावर राजवैभव यांनी जोरदार आक्षेप घेतला. योजना भारत सरकारच्या की मोदींच्या असा प्रश्न त्यांनी समन्वयक वागरे यांना विचारला.