अकरा लाख रुपये भरण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:56+5:302021-01-19T04:26:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मागील कार्यकारिणीने विनाकारण खर्च केलेली १० लाख ७८ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मागील कार्यकारिणीने विनाकारण खर्च केलेली १० लाख ७८ हजार ५९३ इतकी रक्कम १५ दिवसात स्वत:च्या खिशातून महामंडळाच्या न्यासाच्या खात्यामध्ये भरावी, असा निकाल धर्मादाय आयुक्त श. ल. हेलकर यांनी सोमवारी दिला. या निकालामुळे महामंडळाच्या माजी कारभाऱ्यांना दणका बसला असून त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०१० ते २०१५ या कालावधीतील कार्यकारिणीने महामंडळाच्या निधीचा वारेमाप खर्च केल्याच्याविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे महामंडळाच्यावतीने खजिनदार शरद चव्हाण यांनी दावा दाखल केला होता. त्याचा निकाल २०१८ मध्ये लागला. त्यावेळी धर्मादाय आयुक्तांना मागील कार्यकारिणीला या खर्चासाठी जबाबदार धरून १५ दिवसात ११ लाख रुपये महामंडळाच्या न्यासामधून भरावेत, असा आदेश काढला होता. न्यासामधून याचा अर्थ महामंडळाच्या खात्यामधूनच भरायचे, असा अर्थ काढून कार्यकारिणीने ही रक्कम भरली नाही. याविरोधात पुन्हा महामंडळाने धर्मादाय आयुक्तांकडे दावा दाखल केला. याचा निकाल सोमवारी लागला. ११ लाखांची रक्कम न्यासामधून भरावी, ही टंकलेखनातील तांत्रिक चूक असून जबाबदार कार्यकारिणीने ११ लाखांची रक्कम स्वत:च्या खिशातून १५ दिवसात भरावी, असा आदेश देण्यात आला आहे. महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी, आम्ही याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे सांगितले.
---