आवाडेंच्या चिरंजीवासाठी हाळवणकरांची ^‘शिष्टाई’
By admin | Published: June 9, 2017 01:17 AM2017-06-09T01:17:08+5:302017-06-09T01:17:08+5:30
विजया पाटील यांचा ‘स्थायी’चा राजीनामा; राहुल आवाडेंना संधी
समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : इचलकरंजीतील काँग्रेसचे नेते प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल यांच्यासाठी त्यांचेच ‘राजकीय विरोधक’ असलेले भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांना ‘शिष्टाई’ करावी लागली आहे. राहुल आवाडे यांना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर संधी देण्यासाठी कबूनर मतदारसंघातील भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील यांना ‘स्थायी’ समितीचा राजीनामा द्यावा लागला आहे.
जिल्हा परिषदेत भाजप, शिवसेना, जनसुराज्य, ताराराणी आघाडी, ‘चंदगड’ची युवा क्रांती आघाडी, आवाडेंची आघाडी, अपक्षांची संयुक्त सत्ता आल्यानंतर २० एप्रिलला झालेल्या विषय समिती सदस्य निवडीवेळी गोंधळ उडाला होता. बिनविरोध झालेल्या सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र. त्यांच्या समित्या रात्री निश्चित करण्यात आल्या.
अशातच राहुल आवाडे यांनी आपला अर्जच न भरल्याने सत्ताधाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला होता. दहा सदस्यांची नावे चंद्रकांतदादा पाटील आणि अन्य नेत्यांशी चर्चा करून निश्चित केली जातील, असेही या निवडीदिवशी स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर काही नावे निश्चित करण्यात आली. मात्र, तरीही बांधकाम समितीतील १, वित्त समितीतील १ आणि बांधकाम समितीतील २ अशा एकूण चार जागा आजही रिक्त आहेत.
कोणत्याही परिस्थितीत राहुल आवाडे यांना ‘स्थायी’ समितीमध्ये संधी हवी होती. मात्र, ‘स्थायी’च्या सर्व सदस्यांंची निवड जाहीर झाली होती. त्यातून अखेर मार्ग काढण्याची जबाबदारी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर सोपविण्यात आली. हाळवणकर यांनीच अखेर त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडून आलेल्या विजया पाटील यांना राजीनामा देण्याची विनंती केली.
त्यानुसार गेल्या महिन्यात झालेल्या ‘स्थायी’च्या पहिल्याच बैठकीतच विजया पाटील यांनी आपल्या ‘स्थायी’ समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याकडे दिला.
विजया पाटील यांना बांधकाम समितीवर संधी देण्याचे निश्चित करण्यात आले असून त्यानंतरच पाटील यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. आता या ठिकाणी राहुल आवाडे यांना संधी देण्यात येणार आहे तरीही पशुसंवर्धन आणि वित्त समितीच्या एकूण ३ जागा रिक्त आहेत.
या तीनही जागांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांना संधी देण्यात येणार असून त्याबाबतची जबाबदारी राष्ट्रवादीचे युवराज पाटील व काँग्रेसचे उमेश आपटे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
भाजपकडून या सर्व प्रक्रियेची जबाबदारी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते
अरुण इंगवले यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नावे मंजूर झाल्यानंतरच डायऱ्यांचे वाटप
जूनच्या अखेरीस जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन आहे. त्याआधीच होणाऱ्या ‘स्थायी’मध्ये या सदस्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करून त्यानंतर जिल्हा परिषदेच्या डायऱ्यांची अंतिम छपाई करण्यात येणार आहे. या डायऱ्या सर्वसाधारण सभेत सदस्यांना वितरित करण्यात येणार असून, त्याआधी या सदस्यांच्या समिती वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
येणाऱ्या ‘स्थायी’मध्ये शिक्कामोर्तब
या नव्या बदलावर येणाऱ्या ‘स्थायी’ समितीच्या सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. राहुल आवाडे, विजया पाटील यांची स्थायी व बांधकाम समितीवरील तसेच उर्वरित ३ समिती सदस्यांची नियुक्ती या स्थायी समितीमध्ये मंजूर केली जाईल.