चारु चांदणेला दुहेरी जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:53 PM2017-10-10T14:53:58+5:302017-10-10T15:02:21+5:30
राज्यभर गाजलेल्या शाळकरी मुलगा दर्शन शहा खून खटल्यात संशयित आरोपी योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे (वय २७, रा. सुश्रुषा कॉलनी, देवकर पाणंद) याला दोषी ठरवून दुहेरी जन्मठेप व १ लाख ५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी मंगळवारी ठोठावली. दंडातील एक लाख रुपये दर्शनची आई स्मिता शहा यांना नुकसानभरपाई म्हणून देण्यात येईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तीन वर्ष या खटल्याचे कामकाज चालले.
कोल्हापूर,10 : राज्यभर गाजलेल्या शाळकरी मुलगा दर्शन शहा खून खटल्यात संशयित आरोपी योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे (वय २७, रा. सुश्रुषा कॉलनी, देवकर पाणंद) याला दोषी ठरवून दुहेरी जन्मठेप व १ लाख ५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी मंगळवारी ठोठावली.
दंडातील एक लाख रुपये दर्शनची आई स्मिता शहा यांना नुकसानभरपाई म्हणून देण्यात येईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तीन वर्ष या खटल्याचे कामकाज चालले.
२५ तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या खंडणीसाठी दि. २५ डिसेंबर २०१२ ला देवकर पाणंद येथील दर्शन रोहित शहा (१०) या शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित आरोपी चारू चांदणे याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी दि. २० जानेवारी २०१५ पासून येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश बिले यांच्या न्यायालयात होती. ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ३0 साक्षीदार तपासून २२ परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी तयार करून खटला मजबूत केला होता. या अपहरण व खून खटल्यावर मंगळवारी अंतिम सुनावणी झाली.
चांदणे याला सशस्त्र पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. अॅड. निकम यांनी आरोपी चांदणे याला फाशी मिळण्यासाठी प्रमुख दहा मुद्दे न्यायालयासमोर मांडले. आरोपी चांदणे याला न्यायालय कोणीती शिक्षा सुनावते हे ऐकण्यासाठी नागरिकांसह वकीलांनी गर्दी केली होती.
अॅड. निकम यांचा युक्तीवाद ऐकुन न्यायाधिश बिले यांनी आरोपी चांदणे याला तुझ्यावरील आरोपी सिध्द झाले आहेत. तु अमानुष, निंदणीय कृत्य केले आहेस. निर्घुण खून केला आहेस. तुझे वर्तन सुधारण्यासारखे नाही. त्यामुळे तुला ३६४ खंडणी, ३०२ खून, २०१ पुरावा नष्ट करणे या तिन्ही कलमाखाली दूहेरी जन्मठेप व १ लाख ५ हजार रुपये दंड तो न भरल्यास दहा महिने जादा कारावास अशी शिक्षा सुनावत असल्याचे स्पष्ट केले.
नियतिने अडकविले
आरोपी लबाड व ढोंगी आहे. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी आले, तेव्हा तो स्वत: पंच झाला होता. नियती खूप श्रेष्ठ असते. नियती ‘याची देही, याची डोळी’ न्यायनिवाडा करीत असते. सेक्सपिअरने म्हटले आहे, शेवटी खदाखदा असणारी जी नियती असते. चारुला वाटले आपण कायद्याच्या कचाट्यातून सुटलो कारण तो कायद्याला मदत करीत होता. परंतू नियतीने त्याला कायद्याच्या फासात अडकले असल्याचे अॅड. निकम यांनी स्पष्ट केले.
मृत्यूदंडाची शिक्षा द्या
‘कितीही शिकवा दूष्ठाला परी, त्याचा सज्जन होईल का, नदीत धुतले गाडवास तरी त्याचा घोडा होईल का? नागाच्या दातात विष असते. गांजी माशीच्या डोक्यात विष असते. विंचवाच्या नांगीवर विष असते. दूष्ठ मानसाच्या सर्व अंगात विष असते. त्यामुळे आरोपी चांदणे सारख माणसाला एकच शिक्षा मृत्युदंड द्यावी.
आई-आजी भावूक
दर्शन शहा याची आई स्मिता व आजी सुलोचना शहा या सुनावणीला उपस्थित होत्या. सुनावणीनंतर जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांच्या कार्यालयात अॅड. निकम बसले होते. त्याठिकाणी या दोघींनी भेट घेऊन निकम यांचे पाय धरले. स्मिता शहा यांनी देवातला माणुस म्हणून तुमची मी रोज पुजा करीन. तुम्ही होता म्हणून आम्हाला न्याय मिळाला असे भावउद्दगार काढले. तर आजी सुलोचना यांनी माझ्या बाळाला मारल त्या आरोपीच्या हाताची बोटे गळुन पडू दे असा संताप व्यक्त करीत अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
अॅड. निकम यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे
- आरोपी चारु चांदणे याने अत्यंत थंड डोक्याने पूर्ण नियोजन करुन फुकट पैसा मिळविण्याच्या उद्देशाने क्रुर पध्दतीने दर्शनचा २५ डिसेंबर २०१२ रोजी रात्री पावणेआठच्या दरम्यान खून केला.
- दर्शन अवघ्या दहा वर्षाचा होता. त्यावेळी तो पूर्ण निशस्त्र होता. त्याने आरोपीला कोणत्याही प्रकारे चिडवणे किंवा उद्युक्त केले नव्हते.
- दर्शनच्या घरातून २५ तोळे सोने खंडणी मागण्याचा प्रयत्न आरोपीने १२ नोव्हेंबर २०१२ रोजी केला होता. त्यावेळी त्याने सोने नाही मिळाले तर दर्शनच्या खूनाची धमकी त्याच्या आईला दिली होती.
- आरोपीच्या खंडणीचा पहिला कट अयशस्वी झालेनंतर त्याने ४३ दिवसानंतर २५ डिसेंबर रोजी दर्शनला ऊसाच्या शेतात नेवून खंडणीसाठी खून केला.
- आरोपीने दर्शनचा गळा दारोने आवळला होता. त्यानंतर राऊत यांच्या विहीरीत फेकुन दिले होते. यावरुन त्याची क्रुरता स्पष्ट होते.
- आरोपीने दर्शनला ऊस खायाला नेतो असे खोटे सांगून नेले होते. त्याच दिवशी रात्री साडेसातच्या सुमारास सागर चौगुले या साक्षीदाराला आरोपी दर्शनसोबत दिसल्यावर त्याने त्यालाही हेच कारण सांगितले.
- दर्शन हा आरोपीला वडीलभाऊ मानत होता. तो त्याला चारुदादा म्हणून ओळखत होता. त्याने दर्शनचा खून केला नाही तर वडीलभाऊ या नात्याचा खून केला.
- आरोपीने खंडणी व खूनासाठी दर्शन हे सॉप्ट टारगेट असल्याने निवडले होते. कारण त्याचे घरी आई व आजी दोघेच राहत होते. त्याच्या वडीलांचे लहानपणी निधन झाले होते. दर्शनच्या आईला भाऊ, बहिण कोणी नाही. दर्शन हा एकुलता होता.
- दर्शनचा खून केल्यानंतर आरोपीने २५ तोळे सोन्याची मागणी केली होती. यावरुन आरोपीची विक्ती स्पष्ट होते.
- २६ डिसेंबर २०१२ रोजी घरासमोर सापडलेल्या चिठ्ठीच्या पाकिटावर ‘दर्शन की मॉ और दादी के लिये प्यारीभरी भेट’ यावरुन त्याने खूनाचा आनंद लुटला होता.
- आरोपीने दर्शनच्या खूनानंतर २६ डिसेंबरला दर्शनचा मित्र आदित्य डावरे याला धमकी दिली. दर्शनसोबत तु होतास हे कोणाला सांगितलेस तर तुलाही ठार करीन. त्यामुळे आदित्य आजारी पडला. त्याने आरोपीच्या विरोधात जुनाराजवाडा पोलीसांत फिर्याद दिली होती.
खटल्यातील महत्वाचे साक्षीदार
दर्शनची आई स्मिता शहा, आदित्य डावरे, सुनंदा कुलकर्णी, सागर चौगुले, विश्वजित बकरे, अशोक पाटील, माजी नगरसेवक महेश गायकवाड, राजेश परिट, सागर कटके, निखिल मोहिते, अभिजित काटे, श्रीकांत पुनदीकर, संगीता कुलकर्णी, दिलीप मोहिते, सुशांत दामुगडे, युवराज कुरणे, प्रसाद भोसले, पुंडलिक राऊत, निखिल मोहिते, अभिजित काटे, सोहेल शेख, साजिद शेख, सागर ऊर्फ बंडा काटके, संगीता कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी, आनंदा भालकर, कविराज नाईक, श्रीकांत पुनाडीकर, रामदास शिंदे.
अनैसर्गिक कृत्याचा गुन्हा
आरोपी चांदणे याने कॉलनीतीलच पंधरा वर्षांच्या मुलाचे चार वेळा लैंगिक शोषण केले होते. याप्रकरणी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात पिडीत मुलाने फिर्याद दिली होती. त्यामुळे त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा दुसरा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी चांदणे याच्या घरातील अश्लील चित्रफितीची सीडी, डीव्हीडी, टी.व्ही., आदी साहित्य जप्त केले होते. या पिडीत मुलाची साक्ष व जप्त केलेले साहित्य सरकार पक्षातर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आनले होते.
दर्शनच्या आईवर केला होता हल्ला
आरोपी चारू चांदणे यानेच दिवाळीत धनत्रयोदिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास दर्शनची आई स्मिता शहा यांच्यावर घरात घुसून सोन्याच्या चेनकरीता हल्ला केला होता. यावेळी त्याने आपणास कोणी ओळखू नये यासाठी अंगात काळा टी शर्ट, स्वेटर बरमोडा त्यावर काळी पँट-शर्ट, काळी कानटोपी, काळे हँडग्लोज, काळे सॉक्स व डोळ्यावर काळा गॉगल, तोंडावर काळा रूमाल असा वेश परिधान केला होता.
उजव्या हातोप्याच्या आत धारदार चाकू लपवून ठेवला होता. गल्लीत कोणी नसल्याचे पाहून त्याने बाथरूमकडे जाणाºया स्मिता शहा यांच्यावर पाठीमागे जावून तोंड दाबून चेनला हिसडा मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात झटापट झाल्याने नराधम चांदणेचा तोंडावरील हात निसटला व चाकू खाली पडला. स्मिता शहा यांनी आरडाओरड केल्याने गल्लीतील महिला स्मिता यांच्या दारात जमल्याचे पाहून तो घरातून पळून गेला होता.
घटनाक्रम :
१२ नोव्हेंबर २०१२ आरोपीने दर्शन शहा च्या आईकडे मागितली २५ तोळे सोन्याच्या दागिन्यांची खंडणी
२५ डिसेंबर २०१२ : दर्शन शहा याचे खंडणीसाठी अपहरण करुन खून
२६ डिसेंबर २०१२ : दर्शनच्या घरासमोर खंडणीचे पत्र सापडले.
२७ डिसेंबर २०१२ : दर्शनचा घरापासून काही अंतरावरील विहीरीत मृतदेह आढळला.
१३ जानेवारी २०१३ : आरोपी चारु चांदणेला अटक
१७ जानेवारी २०१३ : आरोपी चांदणेवर पंधरा वर्षाच्या मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी लैंगिक शोषणाचा दूसरा गुन्हा दाखल.
१० मार्च २०१३ : आरोपी चांदणेच्या विरोधात सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
३० मार्च २०१३ : आरोपीच्या वकीलांकडून जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल
२० जानेवारी २०१५ : दर्शन शहा खून खटल्यास प्रारंभ
८ फेब्रुवारी २०१५ : अॅड. उज्वल निकम यांची घटनास्थळी भेट
१० फेब्रुवारी २०१५ : आरोपीकडून ‘नार्को टेस्ट’साठी न्यायालयात अर्ज दाखल
२९ फेब्रुवारी २०१६ : आरोपीची मुंबईत ब्रेन मॅपिंगची टेस्ट
९ आॅक्टोंबर २०१७ : न्यायालयाने आरोपीला ठरविले दोषी.
१० आॅक्टोंबर २०१७ : आरोपीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा.