‘बसर्गे’ घटनेचा आठ दिवसांत छडा
By admin | Published: July 26, 2014 12:33 AM2014-07-26T00:33:40+5:302014-07-26T00:34:07+5:30
मनोजकुमार शर्मा : सर्वधर्मीय इफ्तार पार्टीत ‘गडहिंग्लज’करांना ग्वाही
गडहिंग्लज : गडहिंग्लजला शांततेची आणि सामाजिक सलोख्याची मोठी परंपरा आहे. बसर्गेतील प्रकरणातील संपूर्ण माहिती घेतली आहे. पीडित तरुणीसह तिच्या कुटुंबीयांशीही बोललो आहे. पोलिसांवर विश्वास ठेवा, या घटनेचा आठ दिवसांत छडा लावला जाईल, अशी ग्वाही जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिली.
गडहिंग्लज पोलीस ठाणे व मुस्लिम समाज बांधवांतर्फे येथील डॉ. आंबेडकर भवनात आयोजित सर्वधर्मीय इफ्तार पार्टीत डॉ. शर्मा बोलत होते. आमदार संध्यादेवी कुपेकर, नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. शर्मा म्हणाले, पोलिसांबद्दलची भीती कमी व्हावी, गैरसमज दूर व्हावा यासाठी शाळा-कॉलेजच्या मुलांना पोलीस ठाण्यात बोलावून माहिती दिली जात आहे. काही पोलिसांमुळे खात्यावरच बदनामीचा ठपका आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असताना ताण-तणावातही पोलीस चांगले काम करताहेत, त्यानाही समजून घ्या.
याप्रसंगी आमदार कुपेकर, नगराध्यक्ष घुगरे, डीवायएसपी सागर पाटील, प्राचार्य जे. बी. बारदेस्कर, पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांचीही भाषणे झाली.
यावेळी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, नरेंद्र भद्रापूर, बसवराज आजरी, आनंद पेडणेकर, सागर कुराडे, प्रा. सदानंद वाली, राजेंद्र तेली, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)