जिल्ह्यातून लढल्या चौघी, जिंकल्या मात्र संध्यादेवीच

By admin | Published: October 23, 2014 12:34 AM2014-10-23T00:34:04+5:302014-10-23T00:44:18+5:30

एकमेव महिला आमदार : विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवारांचे अस्तित्व नगण्यच; पक्षाकडून फक्त दोघींनाच उमेदवारी

Chaugi wins from the district, but only on the evening | जिल्ह्यातून लढल्या चौघी, जिंकल्या मात्र संध्यादेवीच

जिल्ह्यातून लढल्या चौघी, जिंकल्या मात्र संध्यादेवीच

Next

इंदुमती गणेश - कोल्हापूर -संध्यादेवी कुपेकर यांचा अपवाद वगळता विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महिलांची उमेदवारी केवळ नावापुरतीच मर्यादित राहिली. निवडणुकीस उभारलेल्या चौघींपैकी दोन महिलांना पक्षाने उमेदवारी दिली; तर दोघींनी अपक्ष म्हणून आपले नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये केवळ एका महिला आमदारावर समाधान मानावे लागले आहे.
पुरोगामी कोल्हापुरातून विधानसभेसाठी केवळ चार महिला उमेदवार रिंगणात होत्या. चंदगडमधून राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, जनता दलाच्या स्वाती कोरी, राधानगरीमधून विजयमाला देसाई आणि हातकणंगलेमधून सुरेखा कांबळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता.
दिवंगत आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी असलेल्या संध्यादेवी पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. आमदार म्हणून मिळालेल्या दीड वर्षाच्या अत्यंत कमी कालावधीत त्यांनी चंदगडमध्ये खूप चांगले काम केले. त्यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर हेदेखील विधानसभेसाठी इच्छुक असल्याने घरात संघर्ष नको म्हणून संध्यादेवी यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आघाडी तुटल्यानंतर कार्यकर्त्यांचा आग्रह आणि राष्ट्रवादीने विश्वास टाकत संध्यादेवींनाच पुन्हा उमेदवारी दिली. एकाकी झुंज देत त्यांनी विजय मिळविला.
याच मतदारसंघातून जनता दलाच्या स्वाती कोरी यांनी निवडणूक लढविली होती. स्वाती कोरी या माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या. प्राध्यापिका असलेल्या स्वाती कोरी या शिंदे यांच्या राजकीय वारसदार. त्या अडीच वर्षे गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा होत्या. आता त्या नगरसेविका आहेत. आपल्या शिंदे गटाला नवचैतन्य देण्यासाठी त्यांनी शेवटच्या टप्प्यात निवडणूक रिंगणात उडी घेतली. विधानसभेच्या उमेदवार म्हणून त्या पहिल्यांदाच मतदारांसमोर गेल्या. त्यांना दोन हजार ८१२ मतांवरच समाधान मानावे लागले.
राधानगरी मतदारसंघातून इंदिरा महिला साखर कारखान्याच्या विजयमाला देसाई यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. देसाई या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. त्यांनी देशातील पहिला महिला साखर कारखाना काढला असून, त्याची नोंद गिनेस बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये झाली आहे. उच्चविद्याविभूषित असलेल्या देसाई यांना चार ते पाच भाषा अवगत आहेत. या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर विजयी झाले; तर देसाई यांना फक्त ६१३ मतांवर समाधान मानावे लागले आहे.
हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेच्या महिला आघाडी उपतालुकाप्रमुख सुरेखा कांबळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. कांबळे यांचे सासर पट्टणकोडोलीतील इंगळी गाव. कांबळे या शिवसेनेच्या कार्यकर्त्या. मात्र, पक्षातील गटबाजीमुळे केवळ विरोधाला विरोध म्हणून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांना ८४४ मते पडली. एकूणच, या निवडणुकीत संध्यादेवी वगळता अन्य तीन महिला उमेदवारांचे पानिपतच झाले.

मायलेकींची साथ...
बाबासाहेब कुपेकर राजकारणात असताना कधीही घराबाहेर न पडलेल्या संध्यादेवींना राजकारणात सक्रिय करण्याचे श्रेय त्यांच्या कन्या नंदाताई बाभूळकर यांना द्यावे लागेल. बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर चंदगड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आणि आता विधानसभा निवडणुकीत आईला विजयी करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. पुतण्याने साथ सोडल्यानंतर या मायलेकींनी मिळून चंदगड विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. कार्यकर्त्यांची साथ आणि नंदातार्इंनी सांभाळलेली प्रचारयंत्रणा यामुळे संध्यादेवींचा दणदणीत विजय झाला.

Web Title: Chaugi wins from the district, but only on the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.