आम्ही प्राध्यापक, पण टपरी चालवून करतो उदरनिर्वाह; सीएचबी प्राध्यापकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 01:09 PM2024-09-03T13:09:14+5:302024-09-03T13:09:37+5:30
कोल्हापूर : राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात सीएचबी प्राध्यापकांची अवस्था अत्यंत दयनीय असून, तूटपुंज्या वेतनावर घरातील खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा ...
कोल्हापूर : राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात सीएचबी प्राध्यापकांची अवस्था अत्यंत दयनीय असून, तूटपुंज्या वेतनावर घरातील खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च भागत नसल्याने टपरी, वडापावचा गाडा, भाजीपाला, रंगकाम, गवंडीकाम करून उदरनिर्वाह करावा लागत असल्याची कैफियत सीएचबी प्राध्यापकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल पाठवून मांडली आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील हजारो सीएचबी प्राध्यापकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवून न्याय मागितला आहे.
अल्प वेतन, तेही वेळेत नाही, प्राध्यापक भरती नाही यांसह विविध प्रश्न या प्राध्यापकांनी मेलद्वारे मुख्यमंत्र्यांना कळविले आहेत. प्रत्येक वर्षी नऊ महिन्यांची ऑर्डर देऊन प्रत्यक्ष सात-साडेसात महिनेच दिले जातात. प्रत्येक वर्षी मुलाखत द्यावी लागते, वेळेत वेतन दिले जात नाही, तासाच्या मिनिटाचा घोळ अद्यापही सुरू आहे. प्रति तास ९०० रुपये असताना, प्रत्यक्ष ७२० रुपयेच दिले जातात. तूटपुंज्या वेतनावर घरातील खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च भागत नाही. त्यातच गणेशोत्सवाच्या सुट्टीतील आणि दिवाळी सुट्टीतील वेतन मिळत नाही. परीक्षेची कामे करूनही त्याचे वेतन दिले जात नाही.
महाविद्यालयाची वेळ संपल्यावर बाहेर पडेल ती कामे करून घरातील अतिरिक्त खर्च भरून काढावा लागतो. कोण टपरी चालवतो, कोण वडापाव, भाजीपाला विकतो, तर कोण रंगकाम, गवंडी काम आणि छोटा-मोठा व्यवसाय करतो. महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक सहकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून मान सन्मान मिळत नसल्याची खंत या प्राध्यापकांनी ई-मेलमध्ये व्यक्त केली आहे.
या केल्या मागण्या
ऑर्डर ११ महिन्यांची द्या, प्रति महिना ५० हजार ठोक वेतन द्या.
गणपती व दिवाळी सुट्टीतील वेतन कपात करू नका.
मिनिटांचा घोळ समाप्त करा, प्रत्येक वर्षी मुलाखत न घेता फक्त रिक्त जागांची मुलाखत घ्या, प्राध्यापक भरतीच्या वेळी मोठा आर्थिक व्यवहार असतो, त्यावर नियंत्रण आणा, अशा मागण्या करण्यात आल्या.