सरकारी रुग्णालयाच्या आवारात मिळणार स्वस्त औषधे, मार्चपासून केंद्रे कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 04:05 PM2020-02-27T16:05:19+5:302020-02-27T16:10:38+5:30
ब्रँडेड औषधांच्या वाढलेल्या भरमसाठ किमतीमुळे सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक परवड होत आहे. पण आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरकारी रुग्णालयाच्या आवारात गरीब रुग्णांच्या खिशाला परवडेल, असे स्वस्त किमतीतील औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, त्यासाठी केंद्र सरकारने जेनेरिक औषध जनऔषधी केंद्र योजना सुरू केली आहे.
तानाजी पोवार
कोल्हापूर : ब्रँडेड औषधांच्या वाढलेल्या भरमसाठ किमतीमुळे सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक परवड होत आहे. पण आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरकारी रुग्णालयाच्या आवारात गरीब रुग्णांच्या खिशाला परवडेल, असे स्वस्त किमतीतील औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, त्यासाठी केंद्र सरकारने जेनेरिक औषध जनऔषधी केंद्र योजना सुरू केली आहे.
सरकारी रुग्णालयांच्या आवारात या जेनेरीक औषध दुकानांना तातडीने सुमारे १२० स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. आवारातील ब्रँडेड औषध दुकाने बंद करण्याचे आदेशही दिले आहेत.
सरकारी रुग्णालयात मोफत औषधोपचार होतात. पण उपलब्ध न होणारी औषधे खासगी दुकानातून विकत आणावी लागतात. त्यामुळे स्वस्त किमतीची औषधे शासन राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी जेनेरिक औषध जनऔषधी केंद्र योजना राबविली आहे. मार्च महिन्यापासून ही औषध दुकाने सुरू होत आहेत. केंद्र सरकारचा औषध निर्माण विभाग व ‘ब्युरो आॅफ फार्मा पीएसयूएस आॅफ इंडिया (बीपीपीआय) नियंत्रणाखाली ही यंत्रणा कार्यरत आहे.
जनऔषधी केंद्रे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सरकारी रुग्णालय आहेत तेथे ही जनऔषधी केंद्र सुरू होणार आहेत. मुंबईमध्ये जुहू, परळ, सायन, मुंबई सेंट्रल, भायखळा, कळवा (ठाणे) यासह पुण्यात दोन ठिकाणी, नागपूरमध्ये दोन ठिकाणी तसेच कोल्हापूर, मिरज, सोलापूर, नांदेड, अकोला, औरंगाबाद, बारामती, लातूर, चंद्रपूर, धुळे, यवतमाळ, अंबेजोगाई, जळगाव, गोंदिया, वर्धा येथे प्रत्येकी एक केंद्र.
विद्यार्थ्यांना रोजगार
बी. फार्म, एम. फार्म. विद्यार्थी युवकांना रोजगार मिळावा, या उद्देशाने जनऔषधी योजना सुरू केली आहे. आॅनलाईन अर्ज मागवून औषध केंद्रे दिली आहेत. ही केंद्र सुरू करण्यासाठी मंजूर खुल्या वर्गातील उमेदवारास सरकारकडून २ लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच एस.सी. व एस.टी. प्रवर्गातील उमेदवारास दोन लाखांसह ५० हजार रुपयांची औषधे देण्याची सरकारची योजना आहे.
३० ते ७० टक्के स्वस्त
ब्रँडेड औषधांपेक्षा या योजनेतील औषधे किमान ३० ते ७० टक्के स्वस्त उपलब्ध होणार आहेत.
- देशात वैद्यकीय महाविद्यालये एकूण : ४७८
- राज्यात वैद्यकीय महाविद्यालये एकूण : ५३
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालये : २५
- ट्रस्ट व स्वायत्त संस्थेची वैद्यकीय महाविद्यालये : २७
- खासगी वैद्यकीय महाविद्यालय : १
शासनाने राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात स्वस्त औषध जनऔषधी केंद्र सुरू करण्याचा घेतलेला निर्णय सर्वसामान्य रुग्णांना दिलासादायक आहे. सरकारी रुग्णालयांत उपलब्ध न झालेली काही औषधे बाहेरून खासगी औषध दुकानांतून घ्यावी लागतात, पण त्यासाठी कोणत्याही डॉक्टरांनी दुकान सुचवायचे नाही, कोणत्या दुकानातून औषध खरेदी करावे, हे रुग्णांनी ठरवायचे आहे.
- डॉ. मीनाक्षी गजभिये,
अधिष्ठाता, रा. छ. शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर