नोकरीच्या आमिषाने सव्वा लाखाची फसवणूक
By admin | Published: October 1, 2014 01:15 AM2014-10-01T01:15:08+5:302014-10-01T01:17:44+5:30
पन्नासजणांचा समावेश : कणेरीवाडी येथील घटना, युवकांकडून तक्रार
कणेरी : नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ४५ ते ५० जणांची सव्वा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल माने (पूर्ण नाव समजू शकले नाही, रा. किर्लोस्करवाडी, जि. सांगली) याच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, याबाबत रोहित दिलीप जाधव (वय २२, रा. हुपरी, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयित अनिल माने याने गत ४ सप्टेंबरला सिक्युरिटी गार्ड, कॉम्प्युटर आॅपरेटर, क्लार्क, आदी पदांसाठी जाहिरात दिली. अनिल माने याने यासाठी कणेरीवाडी (ता. करवीर) येथील यशोदा नगर येथे आॅफिस सुरू केले.
जाहिरात वाचून कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील बेरोजगार युवक- युवतींसह पुरुषांनी माने यांच्याशी संपर्क साधला. त्याने ४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या काळात युवक युवतींकडून नोकरीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी रक्कम घेतली. काही बेरोजगारांकडून २७०० रुपये प्रत्येकी यापैकी दोन हजार फी व सातशे रुपये डिपॉझिट अशा स्वरुपात पैसे घेतले. त्यापैकी दोन हजारांची पावती त्याने दिली. अशा वेगवेगळ्या पदांसाठी ४५ ते ५० जणांकडून त्याने पैसे घेऊन बेरोजगार युवक-युवतींकडून पैसे घेतले व ३० सप्टेंबर रोजी सर्वांना नोकरीचे अपॉर्इंटमेंट लेटर देतो असे सांगितले. त्यांच्या कार्यालयात कणेरीवाडी गावातील स्थानिक दोन महिला कामास होत्यो. दोन दिवस अगोदर त्या कार्यालयातील महिलांकडून कार्यालयातील शिक्के, पावती बूक घेऊन तो गेला. आज, मंगळवारी कणेरीवाडीतील कार्यालयात युवक-युती नोकरीबद्दलचे अपॉर्इंटमेंट लेटर घेण्यासाठी आल्यानंतर त्यांना कार्यालय बंद दिसले. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर अनिल माने हा पसार झाल्याचे त्यांना कळले. आपली फसवणूक झाल्याबाबत त्यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांशी संपर्क साधला. आज, मंगळवारी दिवसभर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यासमोर या युवकांनी गर्दी केली होती. फसवणूक झालेल्यांनी आपल्याकडील अनिल माने यास दिलेल्या पैशांची पावती जमा करून तक्रार दिली. याबाबत अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे करीत आहेत. (वार्ताहर)