आॅईलच्या व्यवहारातून कोल्हापूरच्या व्यापाऱ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:49 PM2019-06-21T13:49:00+5:302019-06-21T13:50:14+5:30
आॅईल खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून साडेपाच लाख रुपये आणि धनादेशांचा गैरवापर करून परप्रांतीय व्यापाऱ्याने कोल्हापुरातील व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी रोचला रामुलू रामंजनेयुलू (रा. कुतबुलापूर, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) याच्यावर गुरुवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कोल्हापूर : आॅईल खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून साडेपाच लाख रुपये आणि धनादेशांचा गैरवापर करून परप्रांतीय व्यापाऱ्याने कोल्हापुरातील व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी रोचला रामुलू रामंजनेयुलू (रा. कुतबुलापूर, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) याच्यावर गुरुवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अधिक माहिती अशी, फिर्यादी सुशांत प्रकाश देशमुख (वय ४४, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) यांचा आॅईल ट्रेडर्सचा व्यवसाय आहे. ते तेलंगणा येथील व्यापारी रोचला रामंजनेयुलू याच्याकडून होलसेल दरात आॅईल मागवित होते. धनादेशाद्वारे त्यांचा व्यवहार होत होता. पैसे पाठविल्यानंतर आॅईल पाठवून दिले जात असल्याने देशमुख यांचा रोचलावर विश्वास बसला होता.
देशमुख यांनी साडेपाच लाख रुपये आॅईलसाठी दिले होते. तसेच कोरे धनादेश व लेटरहेडही दिले होते. रोचला याने पैसे स्वीकारून आॅईल पाठविलेच नाहीत, तसेच कोऱ्या धनादेशावर रक्कम लिहून ते बँकेत भरले. देशमुख यांच्या खात्यावर रक्कम शिल्लक नसल्याने ते वटले नाहीत. तसेच लेटरपॅडवर आॅईलची मागणी दाखवून पैसे येणे असल्याचे रोचक याने स्वत:च लिहिले होते.
हा प्रकार देशमुख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली. संशयित रोचक हा तेलंगणा राज्यात राहत असल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. पोलीस उपनिरीक्षक रणजित पाटील तपास करीत आहेत.