fraud: गुंतवणुकीसाठी पडल्या उड्या, अन् आता दामदुप्पट लाभाचा फास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:32 PM2022-11-28T12:32:06+5:302022-11-28T12:34:31+5:30

गेली दीड वर्षे ‘लोकमत’ने या कंपन्यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतली. सामान्य माणसाला शहाणे करण्याचा प्रयत्न केला. शेवटी ‘लोकमत’ जे मांडत आला तेच घडले.

Cheating many people in the name of double profit scheme in kolhapur | fraud: गुंतवणुकीसाठी पडल्या उड्या, अन् आता दामदुप्पट लाभाचा फास

संग्रहित फोटो

googlenewsNext

विश्वास पाटील, उपवृत्तसंपादक लोकमत कोल्हापूर

कोल्हापुरातील राजारामपुरीत तो साधी चहाची गाडी चालवायचा. दामदुप्पट योजनेची त्याला कुणीतरी माहिती दिली. त्यात पैसे गुंतवल्यावर परतावे मिळू लागल्यावर त्यांने अनेकांना या कंपनीबद्दल सांगितले व तो हाच पैसे कमविण्याचा धंदा करू लागला. त्याच्याकडे पैसे गुंतवायला लोकांची रांग लागली. त्यांने स्वत:ही २५ लाख रुपये गुंतवले. सहा महिन्यांपूर्वी चहागाडीवाला अशीच ओळख असलेल्या या व्यक्तीच्या चहागाडीसमोर चक्क एमजे हेक्टर गाडी उभी राहिली. लगेच त्याने समोरच गाळा घेतला. तिथे कॅफे सुरू केले. ही कुणालाही भुरळ घालणारी प्रगती झाली ती दामदुप्पट परतावे देणाऱ्या कंपन्यांच्या जिवावर. हे एक प्रातिनिधिक उदाहरण. अशी कोल्हापूरपासून पलूसपर्यंत आणि कसबा वाळवेपासून खटावपर्यंत कित्येक उदाहरणे आहेत. या कंपनीत पैसे मिळतात, फायदा मिळतोय असे अनुभव यायला लागल्यावर मग या कंपन्यांकडे पैसे गुंतवायला लोंढाच लागला.

कमी कालावधीत जास्त लाभ देणाऱ्या कोणत्याही कंपनीची पद्धतच अशी असते की, सुरुवातीला त्या कंपन्या छप्पर फाडके फायदे देतात. ते नियमित मिळतील अशी पद्धतशीर व्यवस्था करतात आणि एकदा कंपनीचा बोलबाला झाला की मग त्यांना काहीच करावे लागत नाही. आतापर्यंत ज्या ज्या कंपन्या गंडा घालून गेल्या, त्यांनी असेच फसविले आहे. फसविले आहे असे म्हणणेही चुकीचेच आहे, कारण आपण स्वत:हूनच गळ्यात फास अडकवून घेतला आहे. ए. एस. ट्रेडर्स, ग्रोबझ ही त्याची काही उदाहरणे आहेत.

माणूस अडाणी आहे, त्याची फसवणूक झाली असे झाले तर आपण एकवेळ समजू शकतो. परंतु, इथे गुंतवणूक करणारे डॉक्टर, शिक्षक, पोलिस, सरकारी नोकर, रेल्वेतील कर्मचारी, व्यापारी, दुकानदार आणि चार पैसे बाळगून असलेले शेतकरी अशा सर्वच स्तरांतील होते. या कंपन्या पैसे गुंतवा म्हणून सांगायला कुणाकडेही गेल्या नाहीत. त्यांनी तुमच्या गावातील लोक हाताशी धरले. त्यांना भरमसाट पैसे दिले, गाड्या दिल्या. गावातला फाटका माणूस चक्क वन सीआरची भाषा करू लागला. त्याचा झगमगाट पाहून इतरांचे डोळे दीपले. त्याला एवढा फायदा मिळू शकतो, मग मी का मागे राहू, अशी ईर्षाच गावोगावी तयार झाली. त्यातून गुंतवणुकीसाठी उड्या पडल्या.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रत्येकाचे डीमॅट अकाउंट लागते. त्यावर केलेल्या प्रत्येक व्यवहाराची माहिती पुढच्या क्षणाला तुम्हाला मिळते. परंतु, या कंपन्या आम्ही शेअर मार्केटमध्ये फायदा उकळून देत आहोत असे सांगत राहिल्या. परंतु, यातील एकही माईचा लाल असा निघाला नाही की त्याने तुम्ही कुठे शेअर ट्रेडिंग करता ते दाखवा एवढी साधी चौकशीही केली नाही. कोरोनानंतर जगभरातील शेअर मार्केट धापा टाकत असताना वर्षाला १२० टक्के परतावे कोण कसे काय देऊ शकते याचा विचार कुणाच्याही मनात आला नाही. कारण हेच होते की, आजच्या क्षणाला माझा फायदा होत आहे ना, मग बास झाले... हे बुडणार आहे हे त्यांनाही माहीत होते. परंतु, लोकांना एकदा हाव सुटली की ती शांत बसू देत नाही. या व्यवहारात तसेच घडले आहे.

ए. एस. ट्रेडर्समध्ये गुंतवणूक केलेल्या अनेक लोकांना त्यांचे कार्यालय कुठे आहे, त्याचे प्रमुख कोण आहेत.. त्यांची पार्श्वभूमी काय आहे याचाही थांगपत्ता नव्हता. ज्यांनी पैसे गुंतविले, त्यांना त्यांच्याच जवळच्या माणसाने ते गुंतवायला भरीस घातले आहे. कंपनी कुठलीही असेल, मी परका आहे का असा विश्वास देणारेच या फसवणुकीस जास्त जबाबदार आहेत. लोकांनी आता त्यांच्याच खिशाला हात घातला पाहिजे. त्याशिवाय फसव्या योजना गावात यायचे बंद होणार नाही. मंडईत गेल्यावर दहा रुपयांची भाजीची पेंडी घेताना घासाघीस करणारे किंवा पदरच्या भावाच्या पोराला कधी शिक्षणासाठी दहा रुपयांची मदत न करणाऱ्यांनी डोळे झाकून लाखांचे पुडके एजंटाच्या हातात दिले व त्याचे फोटो स्टेटसला लावले. आता त्यांना टाळ्या वाजवत बसायची वेळ आली आहे.

या कंपन्यांमध्ये भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशाचीही मोठी गुंतवणूक आहे. ती रोख आहे. त्यामुळे ती बुडाली तरी तक्रारही करता येणार नाही. फसवणुकीतील रक्कम परत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. कारण कंपनीने कुठेच त्याची गुंतवणूक केलेली नाही. हे पैसे दुबई, थायलंड टूरवर, हॉटेलमध्ये जंगी सोहळे साजरे करण्यावर व एजंटांना कमिशन देण्यावर उडविले आहेत. फसवणुकीबद्दल पोलिसांत गुन्हे दाखल होतील, संशयितांना अटकही होईल. परंतु, त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यातून पैसे परत देण्यापर्यंतची प्रक्रिया फारच संथ असते. तोपर्यंत समाजाचा दबाव कमी होतो आणि झालेली फसवणूक पुन्हा एका प्रकरणाचा इतिहास होते.

‘लोकमत’नेच केला पर्दाफाश..

पोलिसांपासून राज्यकर्त्यापर्यंत आणि इन्कमटॅक्सपासून माध्यमांपर्यंत सगळ्यांना आपण पैशाच्या जिवावर मॅनेज करू शकतो अशी एक खुमखुमी या कंपनी चालकांना होती. परंतु, गेली दीड वर्षे ‘लोकमत’ने या कंपन्यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतली. सामान्य माणसाला शहाणे करण्याचा प्रयत्न केला. शेवटी ‘लोकमत’ जे मांडत आला तेच घडले.

काय आदर्श घ्यायचा..

ए. एस. ट्रेडर्समध्ये अनेक पोलिसांची गुंतवणूक आहे. अमूक एक मोठा डॉक्टर आहे.. अमूक एक प्राध्यापक आहे. हा वर्ग समाजधुरीण. त्यांनी काहीतरी अभ्यास केल्याशिवाय पैसे दिले असतील का, असाही समज मोठ्या समाजाचा झाला. त्यातूनही गुंतवणुकीचा आकडा फुगत गेला.

समाजाने शहाणे व्हावे..

लोकांना कमी कष्टात जास्त लाभ मिळवण्याची चटक लागल्याने रोज नव्या कंपन्या आणि फसणारेही जन्माला येतात. काबाडकष्ट करून मिळविलेले पैसे कुणाच्यातरी स्वाधीन करताना किमान सारासार विचार करा. मेंढराप्रमाणे कुणाच्यातरी मागे धावत जाल तर तुमच्या नशिबी खड्डा ठरलेलाच आहे. आता ए. एस. ट्रेडर्स फसवणुकीत हजारोंंनी असाच खड्डा स्वत:हून शोधला आहे. त्यामुळे आता रडण्यात आणि ऊर बडविण्यात अर्थ नाही.

Web Title: Cheating many people in the name of double profit scheme in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.