लग्न ठरवले, नियोजित वधूलाच घातला सहा लाखांचा गंडा; पुण्याच्या दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 11:19 AM2022-04-23T11:19:44+5:302022-04-23T11:20:25+5:30
लग्न जमविणाऱ्या वेबसाईटवरून त्यांची व संशयित विकास बांदल यांची ओळख झाली. बांदल व त्याचा मित्र राघव पाटील असे दोघे कसबा बावडा येथे डॉ. दीपा यांना भेटण्यासाठी आले. स्थळ पसंत असल्याचे सांगून लग्नाची बोलणी करून लग्नही ठरवले.
कोल्हापूर : शादी डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन त्याने नाव नोंदवले. त्यातून ओळख झाल्यानंतर नियोजित वधूच्या घरी जाऊन स्थळही पाहिले. लग्नाची तोंडी बोलणी केली व स्वयंसेवी संस्था काढण्यासाठी म्हणून ५ लाख ९३ हजार रुपये उकळून फसवणूक केल्याची तक्रार शुक्रवारी शाहुपुरी पोलिसात दाखल झाली आहे. डाॅ. दीपा शशिकांत गवंडी (रा. शिवशक्ती कॉलनी, गोळीबार मैदान, कसबा बावडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विकास रघुनाथ बांदल (रा. गोकुळनगर, गंगोत्री हॉटेलजवळ, कात्रज, पुणे) व राघव उर्फ विलास पाटील (रा. पुणे) या संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, डाॅ. दीपा गवंडी या सामूदायिक आरोग्य अधिकारी म्हणून नोकरी करतात. लग्न जमविणाऱ्या वेबसाईटवरून त्यांची व संशयित विकास बांदल यांची ओळख झाली. बांदल व त्याचा मित्र राघव पाटील असे दोघे कसबा बावडा येथे डॉ. दीपा यांना भेटण्यासाठी आले. स्थळ पसंत असल्याचे सांगून लग्नाची बोलणी करून लग्नही ठरवले. त्यांनी आम्ही तिरुपती कार्पोरेशन ॲण्ड जीवनसंजीवनी नावाची स्वयंसेवी संस्था चालवतो, असे सांगितले. डॉ. दीपा यांच्या मदतीने गणेश कॉलनी, गोळीबार मैदान येथे सुनील जाधव यांचे घर भाड्याने घेऊन तेथे संस्थेचे कार्यालय सुरू केले.
या कार्यालयात कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये अनुदान मिळवून देतो, असे सांगून अनेकांचे अर्ज भरून घेतले. काही लोकांकडून पैसेही उकळले. तसेच गरजू महिलांना १ लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले. हा प्रकार ९ ऑक्टोबर ते २९ डिसेंबर २०२१ या कालावधीत घडला असून, ५ लाख २३ हजार रुपये लोकांकडून उकळले तसेच डॉ. दीपा यांच्याकडून हातउसने व खर्चासाठी म्हणून ७० हजार रुपये घेतले.
अशाप्रकारे ५ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक संशयितांनी केली. संशयित दोघांनी आपली व इतर लोकांची अशी जवळपास सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद डॉ. दीपा यांनी शाहूपुरी पोलिसात दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील पुढील तपास करत आहेत.