स्मशानभूमी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:23 AM2021-04-17T04:23:00+5:302021-04-17T04:23:00+5:30
कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीस व आयसोलेशन हॉस्पिटलला प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी शुक्रवारी ...
कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीस व आयसोलेशन हॉस्पिटलला प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी शुक्रवारी भेट दिली.
स्मशानभूमी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामावर हजर झाल्यानंतर व काम संपल्यानंतर थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सिजन पातळी तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे कोविडमुळे मृत झालेल्या रुग्णांचे दहन करण्याच्या प्रक्रियेबाबत त्यांनी माहिती घेतली. यावेळी आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे व कर्मचारी, आदी उपस्थित होते.
त्यानंतर बलवकडे यांनी आयसोलेशन हॉस्पिटल येथे पाहणी केली. नागरिकांची स्वॅब देण्यासाठी गर्दी होत असल्याने नियमांचे पालन करून त्यांचे स्वॅब घ्या. जास्तीत जास्त नागरिकांचे स्वॅब घ्या. लसीकरण वाढवा, नागरिक उन्हामध्ये उभे राहत असल्याने त्यांना मांडव घालून सावलीची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश जाधव यांना दिल्या.
आयसोलेशन हॉस्पिटल येथे शहराबरोबरच ग्रामीण भागातीलही नागरिक तपासणीसाठी येतात. नागरिक येताना रिक्षाने अथवा एसटी बसने या ठिकाणी येतात. यामध्ये एखादा पॉझिटिव्ह नागरिक असल्यास त्यांच्या प्रवासातून इतर लोकांना संक्रमण होण्याचा धोका आहे. त्यामुळे शहरातील, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या जवळच असणाऱ्या स्वॅब तपासणी केंद्रावर जाऊन तपासणी करावी, असे आवाहन बलकवडे यांनी केले आहे.