मतिमंद, अपंगांच्या सर्व शाळा तपासा

By Admin | Published: November 8, 2016 01:22 AM2016-11-08T01:22:07+5:302016-11-08T01:26:34+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : शित्तूरमधील सर्व मुलांना आज कोल्हापुरात आणणार

Check out all schools of mentally, disabled people | मतिमंद, अपंगांच्या सर्व शाळा तपासा

मतिमंद, अपंगांच्या सर्व शाळा तपासा

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यातील पंधरा अनुदानित आणि तेवीस विनाअनुदानित अंध, अपंग, मूकबधिर आणि मतिमंदांच्या शाळांच्या तपासणीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, तसेच शित्तूर येथील ही सर्व मुले आज, मंगळवारी कोल्हापुरात आणली जाणार असून सीपीआरमधील तपासणीनंतर त्यांना वेगवेगळ्या शाळांमध्ये ठेवण्यात येणार आहे.
शित्तूर तर्फ मलकापूर येथील हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शासनाच्या अनेक विभागांची यंत्रणा हडबडली आहे. सोमवारी जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग, सीपीआर आणि जिल्हाधिकारी कार्यालय या तिन्ही पातळ्यांवर कमालीची धावपळ उडाली. दरम्यान, या सर्व संस्थांची धर्मादाय आयुक्तांकडूनही चौकशी करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले, बालकल्याण समितीचे प्रा. डी. एम. भोसले, संजय देशपांडे, अतुल देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील आदी, उपस्थित होते. या बैठकीतील निर्णयानुसार शित्तूर येथील शाळेतील या सर्व मुलांना आज सीपीआरमध्ये आणून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी अतिरिक्त बेडस्ची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यांची तब्येत ठीक झाल्यानंतर कोल्हापूर बालकल्याण समितीसमोर या मुलांना आणून जिल्ह्यातील चांगल्या संस्थांमध्ये या मुलांची सोय करण्यात येणार आहे.
पंचरत्न राजपाल यांच्या शाळा
शित्तूर तर्फ मलकापूर येथील पंचरत्न राजपाल याने चंद्रकांत हंडोरे सामाजिक न्यायमंत्री असताना मूकबधिरांसाठी एक, मतिमंदांसाठी एक आणि अस्थिव्यंगासाठी एक अशा तीन शाळा मंजूर करून आणल्या. या प्रत्येक शाळेची क्षमता ५० मुलांची आहे. या संस्थेला आधी अनुदान होते तोपर्यंत या शाळा चालल्या; परंतु २०१० नंतर अनुदान बंद झाल्यानंतर मात्र संस्थेची परिस्थिती बदलत गेली. २०१४ ला या शाळांची मुदत संपली. त्यानंतर पुन्हा या शाळांना मुदतवाढ मिळावी म्हणून अर्ज केला. तपासणीनंतर मुदतवाढ देऊ नये, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने पुणे अपंग आयुक्तांकडे पाठविला होता. त्यामुळे विनापरवाना या शाळा सुरू असल्याचे उघड झाले आहे.
मान्यता नसताना मुले हस्तांतरित का केली
एकीकडे या शाळेला मान्यता नसताना २३ जून २०१६ च्या आदेशाने मुंबईच्या समितीने ही मुले या संस्थेकडे हस्तांतरित केली कशी, असा प्रश्न आता विचारला जात आहे. आपल्या संस्थेला मान्यता नसतानाही ही मुले राजपाल यांनी कोल्हापूर बालकल्याण समितीला कोणतीही माहिती न देता का आणून ठेवली, अशी विचारणाही आता होत आहे.
बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत तपासणी
बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत या सर्व शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून ‘महसूल’चे अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त पथकाद्वारे ही तपासणी केली जाणार आहे. संस्था मुलांना कोणकोणत्या सुविधा देतात याची तपासणी करण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील संस्थांनी पुढाकार घ्यावा
जिल्ह्णातील अनेक शाळांना अनुदान नाही. त्यामुळे अनेक संस्था अडचणाीत आल्या आहेत. अनेक मुले अर्धपोटी राहत आहेत. कोल्हापुरात विधायक उपक्रम राबविणाऱ्या अनेक संस्था आहेत. मोफत अन्नदान करण्यापासून ते ‘माणुसकीची भिंत’ उभारण्यापर्यंत अनेक उपक्रम यशस्वी करण्यात आले आहेत. अशा पद्धतीने केवळ शासनाचे अनुदान नाही म्हणून अपंग, मतिमंद, मूकबधिर मुलांचे हाल होणार असतील तर कोल्हापुरातील संस्थांनी पुढाकार घेत या मुलांचे पालक त्व घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


आणखी पाच कुपोषित मुले सीपीआरमध्ये
कोल्हापूर : शित्तूर तर्फ मलकापूर येथील प्रेरणा मागासवर्गीय शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे आधार विद्यालय या निवासी शाळेतील कुपोषणाने अत्यवस्थेत असलेल्या आणखी पाच मुलांना सोमवारी सीपीआरमध्ये दाखल केले. मोनीष भीमाप्पा (वय १६), गंगादीप राजकुमार (१२), राजनंदिनी केराट (१२), मंगल यानके (१४), छोटीगीता (१२) अशी त्यांची नावे आहेत. मुलांची संख्या आठवर पोहोचली आहे. - वृत्त/ हॅलो १


सध्याच्या परिस्थितीत मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येणार असून, मुलांना सीपीआरमध्ये आणून तपासणी केली जाईल. अन्य संस्थांत ठेवले जाईल. या संस्थांची धर्मादाय आयुक्तांकडूनही चौकशी करण्यात येणार असून, शाळांची तपासणीही केली जाणार आहे. मुंबईहून या मुलांना थेट शाहूवाडीला कसे पाठविले, याचीही माहिती घेतली जात आहे.तसेच या सर्व प्रकरणाचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. - डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी

कुपोषित मतिमंद मुले धुळे, मुंबईची
शित्तूर येथील प्रेरणा मागासवर्गीय शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या तीन शाळांमधील मुलांपैकी बहुतांशी मुले ही धुळे आणि ठाणे, मुंबई येथील असल्याचे उघडकीस आले आहे. मानखुर्द मुंबई येथील बाल विकास समितीने ही मुले प्रेरणा संस्थेला हस्तांतरित केली आहेत.- वृत्त/ हॅलो

फौजदारी दाखल करण्याची मागणी
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
विमल पाटील, समाजकल्याण समितीचे सदस्य सुरेश कांबळे, कुंडलिक पाटील यांनी सोमवारी सकाळी सीपीआरमध्ये जाऊन या मुलांच्या तब्येतीची चौकशी केली. दरम्यान, मुलांची ही अवस्था करणाऱ्या आणि परवानगी नसताना मुलांना ठेवणाऱ्या पंचरत्न राजपाल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सौ. विमल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

Web Title: Check out all schools of mentally, disabled people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.