शालेय पोषण आहाराचा साठा तपासा : दीपक म्हैसेकर, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 10:48 AM2019-08-16T10:48:03+5:302019-08-16T10:51:16+5:30
प्राथमिक शाळांमधील शालेय पोषण आहार साठा तपासणीच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय कारण वगळता रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. पूरस्थिती ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत.
कोल्हापूर : प्राथमिक शाळांमधील शालेय पोषण आहार साठा तपासणीच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय कारण वगळता रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. पूरस्थिती ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत.
बंद नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी तातडीने पथके तयार करावीत. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तांत्रिक सल्ल्याने तातडीने कार्यवाही सुरू करण्यात यावी, तीन दिवसांत गावांची स्वच्छता करून घ्यावी, याची जबाबदारी गटविकास अधिकारी आणि पंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांवर राहील.
तात्पुरती शौचालये उभी करावीत, वैद्यकीय मदत पोहोचवणे, पिण्यासाठी शुद्ध पाणी देण्यासाठी प्रयत्न करून जलजन्य आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शालेय पोषण आहारातील खराब धान्याचा तातडीने पंचनामा करून असे साहित्य वापरले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. कर्मचाऱ्यांना रजा देऊ नयेत.
ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग, पूल, शासकीय इमारती, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारती यांचे सर्वेक्षण करून नुकसानीची माहिती तयार करावी. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील तलाव, बंधारे यांचे सर्वेक्षण करून सद्य:स्थितीबाबत पाहणी करून तलाव आणि बंधारे यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. धोकादायक तलाव, बंधारे आढळून आल्यास संबंधित विभागांना अवगत करावे, अशाही सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.
शाळांमध्ये अधिक दक्षता घेण्याची गरज
गेले काही दिवस पूरस्थिती असल्याने अनेक शाळा पाण्याखाली होत्या. त्यामुळे या शाळांच्या इमारतींची योग्य पाहणी करून खात्री केल्यानंतरच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसविणे गरजेचे आहे. तसेच आठ-दहा दिवस शाळा बंद होत्या. त्यामुळे खोल्या झाडूनच शाळा भरविणे सयुक्तिक ठरणार आहे.