चित्त्याच्या चपळाईचा एसटी संघाचा गोलकिपर

By Admin | Published: February 1, 2017 12:07 AM2017-02-01T00:07:18+5:302017-02-01T00:07:18+5:30

--राजेंद्र पोवार

Cheetah's escalator goal keeper | चित्त्याच्या चपळाईचा एसटी संघाचा गोलकिपर

चित्त्याच्या चपळाईचा एसटी संघाचा गोलकिपर

googlenewsNext

राजूचा गोलकिपरचा फॉर्म बहरला. त्याला इतर चांगल्या संघांत मागणी आली. तो आता मेनन अँड मेनन या व्यावसायिक संघात निवडला गेला. या संघात कोल्हापुरातील वेचक खेळाडू होते. हा संघ बेळगाव, सांगली, मिरज, गडहिंग्लज, पुणे, परभणी, नागपूर, मूर्तीजापूर, मुंबई, आदी ठिकाणी खेळला. राजूने वरील ठिकाणी आपल्या गोलकिपिंंगची झलक दाखवून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.
राजेंद्र दत्तोबा पोवार याचा जन्म मरगाई गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे झाला. शाहू स्टेडियम, शिवाजी स्टेडियम, शिवाय गांधी मैदान या ठिकाणी होणाऱ्या मोठ्यांच्या (सीनिअर) स्पर्धा पाहून राजूच्या मनात फुटबॉलची आवड निर्माण झाली. लहान असताना बरोबरीच्या मुलांबरोबर लहान चेंडूने स्पर्धात्मक सामने होत असत. त्यावेळी राजू लहान संघात अनेक प्लेसवर खेळत असे. हळूहळू खेळातील प्रगती आणि शारीरिक वाढ इतकी गतिमान झाली की, राजूने स्वखुशीने संघात ‘गोलकिपर’ याच जागेवर खेळण्याचे निश्चित केले आणि याठिकाणी तो शेवटपर्यंत यशस्वी झाला.
कोल्हापुरात सीनिअर संघात जे अनेक चांगले गोलकिपर तयार झाले व आपली कारकीर्द गाजविली, त्यापैकी राजू पोवार एक होय. प्रकाश रेडेकर, बबन थोरात, पंढरी, बाळ निचिते, सर्जेराव साळोखे अशा प्रसिद्ध गोलकिपर्सच्या जोडीतील राजू पोवार. कोणत्याही संघात ‘गोलकिपर’ हा त्या संघाचा कणा असतो. इतर सर्व खेळाडू चांगले असूनही बळकट गोलकिपरशिवाय संघ मजबूत होत नाही. राजू सुमारे ५ फूट १० इंचपर्यंत उंच. गोलकिपर या प्लेसवर योग्य उंची, बळकट शरीर, मजबूत हाडपेर, विजेची चपळाई, मनगटात मोठी ताकद, बॉलवर झेप घेण्याची त्याची स्टाईल उत्तम. डाव्या, उजव्या बाजूवर ड्राईव्ह टाकण्यात अचूक व माहीर. हवेतील बॉल, जमिनीवरून येणारा बॉल कसा पकडावयाचा याचे ज्ञान अचूक. राजूवर पेनल्टी स्ट्रोक मारणे महाकठीण. जास्त उंचीमुळे गोलपोस्टमध्ये तो उभा राहिल्यानंतर पेनल्टी स्ट्रोक घेणारा संभ्रमात पडत असे. त्याच्याहून पट्टीचा स्ट्रायकर असल्यास राजूवर स्कोअर होत असे. प्रतिस्पर्धी संघाच्या हल्ल्यात कोणता अँगल घ्यावयाचा यामध्ये राजूचे आकलन व ज्ञान चांगले होते. वरून येणारा बॉल तो कधीच सोडत नसे. त्याचे पंचिंग अफलातून होते.
घरची परिस्थिती बेताची असल्याने मित्रांकडून त्यांचे जुने बूट स्टड दुरुस्त करून घालावयाचे व फुटबॉलची हौस भागवायची. राजूला प्रथम महाकाली फुटबॉल तालीम मंडळ या संघातून खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांच्या संघात शिवाजी जांभळे, गणपत साठे, दीपक टिकेकर, कै. पप्पू नलवडे, तानाजी जांभळे, वसंत फडतारे, आदी खेळाडू होते. हा संघ चांगलाच बाळसे धरू लागला. राजूची कामगिरी उठावदार झाली. यावेळी राजू ऐन उमेदीत होता. त्याला सरावास उपलब्ध मैदाने शिवाजी मराठा हायस्कूलचे मैदान, गांधी मैदान, दुधाळी, शाहू मैदान, आदी. प्रारंभी खेळाकरिता त्याला माता-पिता, भाऊ, महाकालीचे जुने खेळाडू कै. जयसिंंग साठे, प्रभाकर सुतार, राम भोसले यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. पुढे उमेश चोरगे, कै. प्रभाकर मगदूम, कै. निशिकांत मंडलिक, शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाची मोलाची भर पडली. गोलकिपिंंगबाबत यांच्याकडे जे जे चांगले तंत्र होते, ते राजूने आत्मसात केले.
राजूचा गोलकिपरचा फॉर्म बहरला. त्याला इतर चांगल्या संघात मागणी आली. तो आता मेनन अँड मेनन या व्यावसायिक संघात निवडला गेला. या संघात कोल्हापुरातील वेचक खेळाडू होते. हा संघ बेळगाव, सांगली, मिरज, गडहिंंग्लज, पुणे, परभणी, नागपूर, मूर्तीजापूर, मुंबई आदी ठिकाणी खेळला. राजूने वरील ठिकाणी आपल्या गोलकिपिंंगची झलक दाखवून सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले. राजूच्या जीवनातील अत्यंत अविस्मरणीय क्षण म्हणजे मेनन अँड मेनन या संघातून खेळत असताना एस. टी. महामंडळाच्या टीम मॅनेजरनी एस. टी. संघातून खेळण्याची विनंती केली आणि त्याचवेळी त्याला कायमच्या नोकरीची आॅर्डर दिली. तो केवळ दहावीपर्यंत शिकला असून, फुटबॉलमुळे त्याच्या जीवनाचे कल्याण झाले.
एस. टी. महामंडळाचा रोजचा दोन वेळचा सराव. लवकरच राजूने महाराष्ट्र एस.टी. संघात गोलकिपर म्हणून उत्तुंग भरारी घेतली. या संघातून खेळत असताना त्याने बिहार, केरळ, आसाम, बंगाल, कोलकाता, लखनौ, ग्वाल्हेर, आदी ठिकाणी आपल्या गोलकिपिंंगचा चांगला ठसा उमटविला. तसेच कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघाकडून तीनवेळा मुंबई येथील मानाचा रोव्हर्स कप खेळण्याची दुर्मीळ संधी त्याला मिळाली. दुर्दैवाने त्याला कॉलेजचे शिक्षण घेता न आल्याने शिवाजी विद्यापीठ स्तरावर खेळण्याची संधी प्राप्त झाली नाही. उच्च शिक्षणाची किंंमत त्याला त्यावेळी समजली व त्याने इतर खेळाडूंना संदेश दिला की, उच्च शिक्षण घ्या, चांगली संगत धरा व व्यसनांपासून दूर राहा. राजू खेळत असताना जिवावर बेतणारे प्रसंगही घडले. प्रथम त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. एकदा कमरेला फ्रॅक्चर झाले. शिवाय हात दोनवेळा फॅ्रक्चर झाला. त्यातूनही बरा होऊन तो बराच काळ खेळला.
या खेळामुळे राजूच्या भाकरीचा प्रश्न सुटला. लोकप्रियता मिळाली. अनेक चांगल्या लोकांच्या ओळखी झाल्या. संपूर्ण भारत पाहावयास मिळाला. मित्रपरिवार वाढला.
(उद्याच्या अंकात : रघुनाथ पिसे)--प्रा. डॉ. अभिजित वणिरे

Web Title: Cheetah's escalator goal keeper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.