स्वयंपाकी शांतामामीने दिली ५० हजारांची देणगी- आभाळाएवढे मन : निवृत्तीनंतरही जोपासली माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:20 AM2021-06-02T04:20:09+5:302021-06-02T04:20:09+5:30
कोल्हापूर : त्यांचे पूर्ण नाव शांताबाई मधुकर कांबळे. परंतु येथील बालकल्याण संकुलाच्या त्या शांतामामी होत्या. त्यांना मूलबाळ नसल्याने गेली ...
कोल्हापूर : त्यांचे पूर्ण नाव शांताबाई मधुकर कांबळे. परंतु येथील बालकल्याण संकुलाच्या त्या शांतामामी होत्या. त्यांना मूलबाळ नसल्याने गेली तीस वर्षे बालकल्याण संकुलातील मुलांना त्यांनी आईसारखी माया दिली. त्या सोमवारी निवृत्त झाल्या. मिळालेल्या निवृत्तीवेतनातील रोख ५० हजार रुपये त्यांनी याच मुलांच्या देखभालीसाठी म्हणून संस्थेला परत दिले व दानत माणसाच्या खिशात नव्हे, तर हृदयात असावी लागते, याचेच प्रत्यंतर आणून दिले. संस्थेतील सर्व मुलांसाठी त्यांनी आज बुधवारी मांसाहारी जेवणही ठेवले आहे.
बालकल्याणमधील नलिनी शां. पंत वालावलकर कन्या निरीक्षण बालगृहात शांतामामी स्वयंपाकीचे काम करत. त्या मूळच्या सौंदलग्याच्या. त्यांचे पती मधुकर कांबळे हे देखील संस्थेचे कर्मचारी. त्यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्या गेली पंचवीस वर्षे संस्थेच्या सेवेत होत्या. सुरुवातीची अनेक वर्षे महिना शंभर रुपये पगारावर त्यांनी नोकरी केली. आताही त्यांना पेन्शन नाही, त्यामुळे मिळालेले पैसे तुमच्यासाठी ठेवा, असा आग्रह संस्थेच्या मानद कार्यवाह पद्मा तिवले यांनी धरला होता; परंतु त्यांनी निवृत्ती समारंभात मदतीची घोषणा करून लगेच रोख पैसे संस्थेच्या स्वाधीन केले. त्या स्वयंपाकी असल्या तरी संस्थेतील पडेल ते काम करायच्या. मुलांना चांगला सकस आहार मिळावा यासाठी त्या धडपडायच्या. त्यांच्या नोकरीला कधीच वेळेचे बंधन नव्हते. असे कर्मचारी लाभले म्हणूनच बालकल्याणही मायेचे घर बनले आहे. निवृत्तीनिमित्त त्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. कन्या निरीक्षणगृहाच्या अधीक्षिका अश्विनी गुजर यांनी प्रास्ताविक केले. स्मिता वायचळ, टी. एम. कदम, सचिन माने, द्रौपदी पाटील यांची भाषणे झाली. संस्थेचे अधीक्षक पी. के. डवरी यांनी आभार मानले.
(फोटो : ०१०६२०२१-कोल-शांताबाई कांबळे-मदत)