इचलकरंजीतील रसायनमिश्रीत सांडपाणी दारातच उचलणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:20 AM2021-04-03T04:20:02+5:302021-04-03T04:20:02+5:30
पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने घेत दोन महिन्यांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह संबंधित ...
पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने घेत दोन महिन्यांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा २२० कोटींचा ढोबळ आराखडा सादर केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या आराखड्याचे सूक्ष्म नियोजन करून प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवा, अशी सूचना केली होती. त्यानुसार आता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रवींद्र आंधळे, प्रशांत गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, समीर व्याघरांबळे, जिल्हा परिषदेच्या प्रियदर्शिनी मोरे, इचलकरंजीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा आराखडा तयार केला आहे.
कोल्हापूर शहरातून स्वच्छ वाहणारी पंचगंगा रुई बंधाऱ्याच्या पुढे मात्र प्रदूषित होत जाते. इचलकरंजीत वस्त्रोद्योग असल्याने तेथे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे आराखड्यात इचलकरंजीसाठी स्वतंत्र एक विभाग करण्यात आला आहे. हा आराखडा आता पालकमंत्र्यांसमोर मांडण्यात येणार आहे. त्यांच्या सुचनेनुसार काही दुरुस्त्या असतील तर त्यांचा समावेश करून आराखडा राज्य शासनाला सादर केला जाईल.
--
सोलरद्वारे सांडपाणी प्रक्रिया
जिल्ह्यातील ज्या १७१ गावांचे सांडपाणी पंचगंगेत मिसळते त्यापैकी ३९ गावं नदीकाठावर आहेत. यातील २-३ गावांचे सांडपाणी एकत्र करून त्यावर सोलर सिस्टमद्वारे प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
-
बायोडायझेस्टर
इचलकरंजीतील १६० सायझिंग उद्योग, १५ डाईंग युनिट येथील रसायनमिश्रीत सांडपाणी तेथून उचलून नेवून त्यावर बायोडायझेस्टरद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे.
--
उद्योगांचे झिरो डिस्चार्ज
इचलकरंजीतील ६७ टेक्सटाइल उद्योग आहेत. या उद्योगांचे सांडपाणी १२ एमएलडीच्या सीईटीपी प्लॅन्टला जोडण्यात येणार आहे, तसेच फाइव्ह स्टार एमआयडीसीतील ६ उद्योगांचे १० एमएलडीचे प्लॅन्ट उभारून सांडपाण्याचे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणलेे जाणार आहे.
--
ग्रामपंचायतींना बिनव्याजी कर्ज
जिल्हा परिषदेसमोर एसटीपी प्लॅन्ट उभारण्यासाठी जागा आणि पैश्यांचा प्रश्न होता. त्यावर मार्ग काढत नाले आणि ओढ्यांवर हे प्लॅन्ट उभारले जाणार आहेत. ज्या ग्रामपंचायतींकडे यासाठी पैसे नाहीत. त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आराखडा तयार करण्यासाठी २ लाख व प्लॅन्ट उभारण्यासाठी दीड कोटींचे कर्ज १० वर्षांसाठी बिनव्याजी दिले जाणार आहे. त्यासाठी आठ गावांनी मान्यता दिली आहे.
--
आराखड्यातील समाविष्ट बाबी
इचलकरंजीचा स्वतंत्र विभाग
कुरुंदवाड, शिरोळ आणि हातकणंगले या तीन नगरपंचायती, १७१ गावं, तीन सरकारी एमआयडीसी, पाच सहकारी वसाहती, आठ साखर कारखाने, पाच आसवण्या.
---