रसायनयुक्त सांडपाणी थेट गटारीत
By admin | Published: February 1, 2015 11:57 PM2015-02-01T23:57:49+5:302015-02-02T00:10:18+5:30
इचलकरंजीतील प्रकार : पंचगंगा प्रदूषण प्रश्न पुन्हा चर्चेत
इचलकरंजी : येथील आदर्श मंगल कार्यालयासमोर असलेल्या गटारीमधून गेल्या सहा दिवसांपासून प्रोसेसिंग हाऊसचे रसायनयुक्त सांडपाणी बाहेर पडत आहे. आज, रविवारी दुपारी मोठ्या प्रमाणात गटारीतून पाणी रस्त्यावर बाहेर पडत होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबरोबरच पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष केले आहे. इचलकरंजीतील प्रोसेसर्स हाऊसचे रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया करून सोडण्यासाठी क्लस्टर योजनेच्या माध्यमातून सीईटीपी प्रकल्प उभारण्यात आला आहे. असे असताना काही प्रोसेसर्सधारक सीईटीपीला जोडणी करूनही काही प्रमाणात रसायनयुक्त सांडपाणी गटारीत सोडतात. त्यामुळे विनाप्रक्रिया हे रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. येथील आदर्श मंगल कार्यालयासमोर असलेल्या गटारीच्या झाकणामधून आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पिवळ्या रंगाचे रसायनयुक्त सांडपाणी बाहेर येऊ लागले. या परिसरातील एका नागरिकाचा पाय पाण्यात गेल्याने त्याला किरकोळ इजाही झाली. त्यामुळे नगरसेवक प्रमोद पाटील व मदन झोरे यांनी त्याठिकाणी जाऊन सीईटीपी व प्रोसेसर्सधारकांना बोलावून घेतले. परिसरातील ३० ते ४० प्रोसेसर्सधारक त्याठिकाणी आले होते. हे पाणी नेमक्या कोणत्या प्रोसेसर्समधून बाहेर पडत आहे, हे पाहण्यासाठी गत दोन दिवसांपासून आम्ही आमचे प्रोसेसर्स हाऊस बंद ठेवले आहेत. तरीही पाणी येतच आहे. आम्ही आमचे सांडपाणी सीईटीपीला प्रकल्पाला जोडले असून, त्यासाठी येणारा खर्चही नियमित सीईटीपीकडे भरत आहोत. त्यामुळे गटारीत पाणी सोडण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका प्रोसेसर्सधारकांनी घेतली. तसेच सीईटीपीने उपलब्ध करून दिलेल्या पाईपलाईन कमी रुंदीच्या असल्याने त्यामधून ओव्हर प्लो होऊन हे पाणी बाहेर पडत असेल, असेही काहींनी सांगितले. त्यावर सीईटीपी प्रशासनाने आणखीन एक पंप बसवून हे पाणी ओढून घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, गेल्या सहा दिवसांपासून हे पाणी विनाप्रक्रिया थेट गटारीतून जात आहे. त्याचबरोबर शहरातील अन्य कोणकोणत्या भागात अशा प्रकारे सीईटीपीच्या भोंगळ कारभारामुळे पाणी गटारीतून थेट पंचगंगा नदीत जाते, हेही तपासून पाहण्याची गरज असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. (प्रतिनिधी)