शौमिका महाडिकांच्या सत्काराला ‘पी. एन’ समर्थकांची दांडी
By admin | Published: March 25, 2017 05:41 PM2017-03-25T17:41:35+5:302017-03-25T17:41:35+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची किनार : महाडिक यांची खेळी ‘पी. एन’ यांच्या जिव्हारी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत झालेल्या नाट्यपूर्ण घडामोडीचे पडसाद ‘गोकुळ’ दूध संघात उमटू लागले आहेत. दूध संघाच्यावतीने शनिवारी आयोजित केलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, सदस्य राहुल पाटील, रेश्मा देसाई यांच्या सत्काराला राहुल पाटील हे अनुपस्थितीत राहिलेच; पण त्याबरोबर पाटील समर्थक संचालकांनीही कार्यक्रमाला दांडी मारली. अध्यक्ष निवडीनंतर महाडिक यांनी कितीही एकदिलाची भाषा केली, तरीही अध्यक्षपदासाठी त्यांनी खेळलेल्या खेळी पी. एन. पाटील यांच्या जिव्हारी लागल्याचे या घडामोडीवरून स्पष्ट झाले.
कॉँग्रेस, राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राहुल पाटील यांचे नाव शेवटपर्यंत आघाडीवर राहिले. पाटील यांनी लावलेल्या जोडण्यांना सुरुंग लावत महादेवराव महाडिक यांनी शौमिका महाडिक यांना अध्यक्ष करून हुकलेली संधी व्याजासह वसूल केली; पण यामुळे पी. एन. पाटील हे बॅक फूटवर गेले. त्याची सल पाटील यांच्या मनात राहणार आहे. अध्यक्षपदाच्या वादाची ठिणगी ‘गोकुळ’मध्ये पडणार, अशी अटकळ सर्वांची आहे; पण अध्यक्ष निवडीनंतर ‘पी. एन. पाटील व आपला दोस्ताना कायम राहील’ असे वक्तव्य करून महाडिक यांनी पाटील यांचा राग थोडा शांत करण्याचा प्रयत्न केला.
अध्यक्ष निवडीनंतर शौमिका महाडिक यांचा पहिला जाहीर सत्कार ‘गोकुळ’ने आयोजित केला होता. या सत्काराला राहुल पाटील व त्यांचे समर्थक संचालक उपस्थित राहणार का? याविषयी उत्सुकता होती; पण राहुल पाटील यांच्यासह संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील यांनी पाठ फिरविली. यावरून अध्यक्षपदाच्या निवडीतील महाडिक यांची खेळी ‘पी. एन.’ यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे स्पष्ट होते.
घरातील भांडणाने लहानांची किलबिल
‘गोकुळ’ लाखो दूध उत्पादकांचा परिवार असून, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून घरातील दोन मोठ्या माणसांमध्ये भांडण लागल्याने घरातील लहानांची (संचालकांची) किलबिल झाली. अशा शब्दांत संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अस्वस्थता व्यक्त केली. आतापर्यंत या कुटुंबाला जपण्याचे काम महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी केल्याने कोणत्या तरी कारणाने घराला तडा जाणार नसल्याचा विश्वास धैर्यशील देसाई यांनी व्यक्त केला.
पेशंट बरे झाले का?
‘गोकुळ’च्या कार्यालयात आल्याबरोबर,‘पेशंट (रेश्मा देसाई) बरे आहेत का? सोलापूरहून कधी आले,’ अशी मिश्कील टिप्पणी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केल्याचे धैर्यशील देसाई यांनी सांगितले.