कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून चेतन नरके लढणार, अरुण नरकेंनी केलं जाहीर
By भीमगोंड देसाई | Published: December 1, 2022 04:05 PM2022-12-01T16:05:57+5:302022-12-01T16:24:40+5:30
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीला बराच अवधी असला तरी कोल्हापुरातून लोकसभेसाठी पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 'गोकुळ'चे ज्येष्ठ संचालक ...
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीला बराच अवधी असला तरी कोल्हापुरातून लोकसभेसाठी पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 'गोकुळ'चे ज्येष्ठ संचालक आणि इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी आज, गुरूवारी हे जाहीर केले.
दूग्ध व्यवसाय आणि उत्पादक, ग्राहकांचे प्रश्न केंद्रीय पातळीवर मांडण्यासाठी चेतन नरके खासदार होणे आवश्यक असल्याचे सांगत अरुण नरके यांनी चेतन हे कोल्हापूरलोकसभा मतदारसंघातून लढतील, अशी घोषणा केली. इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डातर्फे येथे जानेवारीमध्ये परिषद होणार आहे. यासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत अरुण नरके यांनी ही राजकीय घोषणा केली. उमेदवारी जाहीर केली तरी कोणत्या पक्षातून लढणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.
अरूण नरके म्हणाले, लोकसभेत कोल्हापूरचे विविध प्रश्न मांडणारे अभ्यासू लोकप्रतिनिधी हवेत. सहकार, बँकिंग, दुग्ध व्यवसायासह शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्यांचा अभ्यास चेतन यांना आहे. असा अभ्यासू लोकप्रतिनिधी संसदेत असावा. म्हणून त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी.