Lok sabha 2024: ‘हातकणंगले’तून नकार, ‘कोल्हापुरा’तून रिंगणात उतरणार - चेतन नरके
By भीमगोंड देसाई | Published: March 28, 2024 02:27 PM2024-03-28T14:27:07+5:302024-03-28T14:28:32+5:30
तीन-चार पक्षांनी दिला आहे प्रस्ताव, विजयासाठी लढणार
कोल्हापूर : हातकणंगले मतदार संघातून निवडणूक लढण्यास नकार देत ‘कोल्हापूर’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांनी आज, गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. यामुळे कोल्हापुरात आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या तीन वर्षापासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. माझा संपर्क आणि कामाच्या आवाक्यामुळे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढण्याची ऑफर दिली होती. मात्र कमी दिवसांत मतदारसंघातील सर्व गावांत पोहचणे शक्य नसल्याने मी हातकणंगलेतून लढण्यास नम्रपणे नकार दिला आहे. पण ‘कोल्हापूर’ मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार आहे. तीन ते चार पक्ष माझ्या संपर्कात आहे. कोणत्या पक्षाकडून लढणार हे मी लवकरच जाहीर करेन, अशी माहिती ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांनी दिली.
ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या बैठकीत हातकणंगलेतून माझे नावे पुढे आले होते. पण मी या मतदारसंघातून लढण्यास नकार दिला आहे. कोल्हापुरातून तयारी केली आहे. या मतदारसंघातून जिंकण्यासाठी लढणार आहे. कोल्हापूरसाठी मी संपर्क मोहीम गतीमान केली आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीतून दुसरे नाव पुढे आले तरी मी अजून निवडणूक रिंगणातून एक्झिट घेेतलेलो नाही. मी रिंगणार राहणार आहे. पक्ष, गट कोणता हे मी आगामी काळात जाहीर करेन. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी, विकासाला प्राधान्य देते. माझ्याकडे विकास करण्याची क्षमता आहे. यामुळे मतदार तिसरा पर्याय म्हणून माझा निश्चित विचार करतील.