उत्तर भारतीयांची छठपूजा यंदा घरीच; प्रशासनाने नदीघाटावर परवानगी नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 10:49 AM2020-11-20T10:49:02+5:302020-11-20T10:53:26+5:30
coronavirus, collcator, kolhapurnews, Religious programme कोरोनामुळे यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी तलाव तसेच नदीघाटावरील छठपूजेची परवानगी गुरुवारी रद्द केली आहे. प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीनुसार एका दिवसात सार्वजनिक ठिकाणावरील पूजेची सगळी व्यवस्था होणार नाही; त्यामुळे सर्व भाविकांनी आपल्या घरीच स्वत: व्यवस्था करून पूजा करावी, असे आवाहन राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाचे कार्यकारी अध्यक्ष ओमनारायण मिश्रा यांनी केले आहे.
कोल्हापूर : कोरोनामुळे यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी तलाव तसेच नदीघाटावरील छठपूजेची परवानगी गुरुवारी रद्द केली आहे. प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीनुसार एका दिवसात सार्वजनिक ठिकाणावरील पूजेची सगळी व्यवस्था होणार नाही; त्यामुळे सर्व भाविकांनी आपल्या घरीच स्वत: व्यवस्था करून पूजा करावी, असे आवाहन राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाचे कार्यकारी अध्यक्ष ओमनारायण मिश्रा यांनी केले आहे.
उत्तर भारतीयांचा छठपूजा हा धार्मिक कार्यक्रम आज, शुक्रवारी कोल्हापूर व इचलकरंजी येथील पंचगंगा नदीघाट व तलावाच्या ठिकाणी करण्यात येणार होता. त्यासाठी सुुरुवातीला जिल्हा प्रशासनाने ५० माणसांना अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली होती; परंतु, दिवाळी उत्सव व हिवाळा लक्षात घेता या आजाराच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे.
तसेच नदीकाठावर तलावाकाठी छठपूजेदरम्यान दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता, या ठिकाणी कोरोनासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे विशेषत: सामाजिक अंतर राखणे शक्य होणार नाही, या कारणास्तव सूर्यषष्ठी व्रत व छठपूजेची परवानगी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रद्द केली व तसे निर्देश महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना गुरुवारी दिले.
सार्वजनिक ठिकाणी पूजा करायची असेल तर संस्थेने कृत्रिम तलाव उभारावा, नंतर तो बुजवावा, भाविकांची आरोग्य तपासणी करावी, एकमेकांच्या वस्तूंची देवाणघेवाण करू नये, सॅनिटायझर्स ठेवण्यात यावेत. हे ठिकाण निर्जंतुकीकरण करण्यात यावे अशा अटी घालण्यात आल्या आहेत. ही सगळी व्यवस्था एका दिवसात करणे शक्य नसल्याने संघाने सर्व भाविकांना घरीच राहून ही पूजा करण्याचे आवाहन केले आहे.