शिरोळच्या ‘छत्रपती ग्रुप’च्या अध्यक्षाची धुलाई
By admin | Published: September 15, 2015 01:33 AM2015-09-15T01:33:54+5:302015-09-15T01:33:54+5:30
सायबर चौकातील प्रकार : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक; परस्परविरोधी फिर्याद
कोल्हापूर : रेल्वे खात्यात नोकरीचे आमिष दाखवून दहा लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या शिरोळच्या ‘छत्रपती ग्रुप’च्या अध्यक्षाला राजारामपुरी सायबर चौकात तरुणांनी बेदम चोप दिला. प्रमोद सुरेश पाटील (रा. पद्माराजे हौसिंग सोसायटी, उजळाईवाडी, ता. करवीर, मूळ गाव राजापूर, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासह अनुप व आणखी दोघांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी मच्छिंद्र बंडोपंत हांडे (वय ३१, रा. सम्राटनगर) याने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, फिर्यादी मच्छिंद्र हांडे हा प्रॉपर्टी एजंटाचे काम करतो. त्याची संशयित प्रमोद पाटील याच्याशी तोंडओळख झाली होती. त्यातून त्याने मच्छिंद्र व त्याचा मित्र अवधूत देसाई (रा. आर. के. नगर) यांना रेल्वे खात्यात सरकारी नोकरी लावतो, असे सांगत वेळोवेळी दोघांच्याकडून प्रत्येकी दहा लाख रुपये घेतले होते. पैसे देऊनही नोकरी न लावल्याने त्यांनी त्याला विचारणा केली असता त्याने सोमवारी दुपारी दोघांना राजारामपुरी सायबर चौक येथील एका हॉटेलच्या दारात बोलावून घेतले. त्यानंतर त्याने मी तुम्हाला पैसे देत नाही, तुमचे पैसे मी घेतलेले नाहीत, तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या अनुप नावाच्या व्यक्तीने बेसबॉल स्टीकने या दोघांना मारहाण केली. त्यामध्ये या दोघांच्या मांडीवर व कपाळावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जागृतीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या प्रकाराची माहिती त्यांच्या मित्रांना समजताच त्यांनी प्रमोद पाटील याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यासह चौघांच्या विरोधात जखमी हांडे याने राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी प्रमोद पाटील याच्यासह चौघांच्या विरोधात ४२०, ३२४, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे फसवणूक व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, प्रमोद पाटील याने अवधूत देसाई व मच्छिंद्र हांडे या दोघांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी देसाई व हांडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.