कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2016 01:30 AM2016-10-21T01:30:50+5:302016-10-21T01:30:50+5:30
देवेंद्र फडणवीस : विकास निधीच्या मंजुरीचे संभाजीराजे यांना पत्र देवेंद्र फडणवीस : विकास निधीच्या मंजुरीचे संभाजीराजे यांना पत्र
कोल्हापूर : कोल्हापूरच्या विमानतळाची स्थापना छत्रपती राजाराम महाराज यांनी केली आहे. त्यामुळे या विमानतळाला त्यांचे नाव देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. १९) मुंबईत दिले. तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अपेक्षेनुसार कोल्हापूर विमानतळ विकास आराखड्याच्या खर्चापैकी निर्धारित निधी राज्य शासन देणार असल्याचे पत्र त्यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे दिले.
कोल्हापूर विमानतळाचा विकास, सेवा प्रारंभाबाबत चर्चेसाठी दिल्लीमध्ये मंगळवारी (दि. १८) भारतीय विमानतळ प्राधिकरण व नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे बैठक घेण्यात आली. यात प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी कोल्हापूरचा विमानतळ कार्यरत नसल्याने विकास आराखड्यातील एकूण खर्चाच्या ३० टक्के रकमेचा भार राज्य सरकारने उचलावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. तसेच प्राधिकरणाच्या अपेक्षेनुसार राज्य शासनाने आपल्या हिश्श्याचा वाटा उचलण्याची लेखी विनंती केली. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ प्रतिसाद देत विमानतळासाठी राज्य शासनाच्या हिश्श्याच्या निधीला तत्त्वत: मंजुरी दिली. शिवाय त्यांनी भारतीय विमान प्राधिकरणाला आम्ही हिस्सा उचलण्यास तयार असल्याचे कळविले. या संदर्भातील लेखी पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिले. (प्रतिनिधी)
ठोस कार्यवाहीचे पाऊल
याशिवाय विमानतळ विकास आराखड्यातील खर्चाच्या २७४ कोटी रुपयांपैकी राज्य शासनाच्या हिश्श्याची २० टक्के रक्कम देण्याचे पत्र दिले आहे. निधी देण्याबाबतचे अधिकृत पत्र मिळाल्यामुळे विमानतळ विकास व सेवा सुरू करण्याच्या दिशेने ठोस कार्यवाहीचे पाऊल पडले असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांच्या करवीरनगरीच्या विकासासाठी निधी कदापि कमी पडू न देण्याचे व यासाठी अजूनही निधी लागला, तर तो दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे तातडीने परवाना मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे
मुंबईत बुधवारी विमानतळ प्राधिकरणाच्या अपेक्षेनुसार विमानतळ विकास आराखड्यातील खर्चाची रक्कम राज्य शासनाने द्यावी, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिले.