kolhapur news: ‘राजाराम’मध्ये महाडिकांनी ‘कंडका’ पाडला, आमदार सतेज पाटलांना हादरा
By राजाराम लोंढे | Published: April 25, 2023 07:22 PM2023-04-25T19:22:45+5:302023-04-25T19:35:46+5:30
पहिल्या फेरीपासूनच महाडिक आघाडीवर
कसबा बावडा : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार महादेवराव महाडिक व अमल महाडिक महाडिक यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीने सहाव्यांदा कारखान्याच्या चाव्या आपल्या ताब्यात ठेवल्या. सर्वच्या सर्व २१ जागा सरासरी १४०५ मताधिक्याने जिंकत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना जोरदार हादरा दिला.
सत्तांतर करून ‘कंडका’ पाडणारच, या इर्षेने सतेज पाटील रिंगणात उतरले होते; मात्र ‘राजाराम’च्या सभासदांनी पुन्हा महादेवराव महाडिक यांच्यावरच विश्वास दाखवून सतेज यांच्याच मनसुब्याचा ‘कंडका’ पाडला. निकालानंतर फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी जोरदार आनंद व्यक्त केला.
येथील रमणमळ्यातील शासकीय गोदामात २९ टेबलांवर दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. शेवटचा निकाल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जाहीर झाला. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मित्र असणारे महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यातील संघर्ष २००९ च्या विधानसभेपासून सुरू झाला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत महाडिक-पाटील आमने-सामने आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार असतानाही, ‘आमचं ठरलंय’ ही टॅगलाइन घेऊन त्यांनी शिवसेनेचे संजय मंडलिक यांना निवडून आणले. तेव्हापासून हा संघर्ष आणखी तीव्र झाला.
त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ऋतुराज पाटील यांनी ‘कोल्हापूर दक्षिण’मधून अमल महाडिक यांचा पराभव करीत, ‘आमचं ठरलंय, गोकुळ उरलंय’ असा इशारा दिला. महादेवराव महाडिक यांच्याकडे असणारे ‘गोकुळ’ ताब्यात घेत, आता ‘आता आमचं ठरलंय कंडका पाडायचा’ ही टॅगलाइन घेऊन राजाराम कारखान्याच्या मैदानात सतेज पाटील उतरले. गेले महिनाभर त्यांनी कार्यक्षेत्रातील गावे अक्षरश: पिंजून काढली. मागील निवडणुकीतील चुका सुधारत त्यांनी अत्यंत कडवे आव्हान उभे केले.
महाडिक गटाने पहिल्यांदा न्यायालयीन लढाईत सभासद पात्र करीत अर्धी लढाई जिंकली. विरोधी पॅनेलमधील तगड्या उमेदवारांना छाननीत अपात्र ठरवीत महाडिक यांनी विजय सोपा केला. तरीही सतेज पाटील यांनी साम, दाम, दंड या नीतीचा ताकदीने वापर करीत, शेवटपर्यंत निकराची झुंज दिली; पण त्यांना अपयश आले. महाडिक यांचे सर्व २१ उमेदवार एकतर्फी विजयी झाले. या निवडणुकीसाठी रविवारी (दि. २३) चुरशीने ९१.१२ टक्के मतदान झाले होते. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात होते.
महादेवराव महाडिक संस्था गटातून विजयी
महादेवराव महाडिक हे संस्था गटातून, तर अमल महाडिक हे ऊसउत्पादक गटातून रिंगणात हाेते. संस्था गटात १२९ मते होती, त्यापैकी १२८ मतदान झाले. यामध्ये महाडिक यांना ८४, तर विरोधी उमेदवार ४४ मते मिळाली. या गटातही आपण महाडिक यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावू असे वाटत होते; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. महाडिक विरोधी उमेदवारापेक्षा दुप्पट मते घेऊन विजयी झाले.
पहिल्या फेरीपासूनच महाडिक पॅनेल आघाडीवर
पहिल्या फेरीत हातकणंगले तालुक्यातील गावांचा समावेश होता. त्यामुळे या फेरीत महाडिक पॅनेलचे सर्व उमेदवार ६२३ ते ८४४ च्या मताधिक्याने आघाडीवर राहिले. दुसरी फेरी करवीर, पन्हाळा, राधानगरी व गगनबावडा तालुक्यातील होती. या फेरीत मताधिक्य कमी होईल, अशी अपेक्षा सतेज पाटील यांना होती; मात्र येथेही मताधिक्य वाढून १४०५ पर्यंत पोहोचले. एकाही फेरीत विरोधी आघाडीस मताधिक्य मिळाले नाही.
‘शिरोली’ महाडिकांचीच..!
हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली हे महादेवराव महाडिक यांचे गाव; मात्र सतेज पाटील यांनी येथे मोठ्या प्रमाणात यंत्रणा सक्रिय केली होती. येथे महाडिक यांच्या उमेदवारांना ७१४, तर पाटील यांच्या उमेदवारांना १२७ मते मिळाली. एकूण मतांच्या ८३ टक्के मते ही महाडिक यांना मिळाल्याने विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरी शिरोली महाडिक यांच्या मागे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
बावड्यात अपेक्षित पाठबळ नाही..
कसबा बावडा हे सतेज पाटील यांचा बालेकिल्ला आहे, शिरोली येथील मताधिक्य बावड्यात कमी करू, असा विश्वास पाटील यांना होता; मात्र बावड्यातील ९७५ पैकी ६०६ मते पाटील यांच्या उमेदवारांना, तर ३०९ मते महाडिक यांच्या उमेदवारांना मिळाली. विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही त्यांना अपेक्षित मताधिक्य बावड्यातून न मिळाल्याने, यावेळी त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले होते; मात्र या निवडणुकीतही अपेक्षित पाठबळ मिळाले नाही.
कुंभीचे पडसाद
कुंभी-कासारी कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी माजी आमदार चंद्रदीप नरके यांना उघड पाठबळ दिले. त्याचेही पडसाद या निकालात उमटले. नरके यांनी म्हणाव्या तेवढ्या ताकदीने मदत केली नाही आणि कुंभीतील विरोधी काँग्रेसचा गट मात्र महाडिक पॅनेलच्या विजयासाठी सक्रिय झाला.
निवडणूक विभागाचे उत्तम नियोजन
या कारखान्याच्या निवडणुकीत दोन मातब्बर गट उतरल्याने निवडणूक यंत्रणेवर प्रचंड दबाव व तितकाच ताण होता; परंतु तरीही निवडणूक अधिकारी निळकंठ करे, सहायक अधिकारी प्रदीप मालगावे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन करून वेळेत निकाल जाहीर केला. त्यांना कारखाना प्रशासनातील कर्मचाऱ्यांनीही चांगली मदत केली.
जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलणारी ही निवडणूक आहे. गोरगरीब शेतकरी सभासदांच्या पाठिंब्यामुळे हा विजय झाला. शेलारमामाच्या लांगेत बोटे घालण्याचा कुणी प्रयत्न करू नये... फुकून टाकीन.- महादेवराव महाडिक, सत्तारूढ आघाडीचे नेते
छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत ज्यांचा ऊस येत नाही अशा वाढीव सभासदांची मते हाच निकालातील टर्निंग पॉइंट ठरला. सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे. निवडणुकीत यशापयश येत असते. ते स्वीकारून पुढे जाऊ. -सतेज पाटील, विरोधी आघाडीचे नेते.