कणेरी मठावर छत्रपती शाहू दालन
By Admin | Published: January 4, 2015 01:19 AM2015-01-04T01:19:38+5:302015-01-04T01:19:59+5:30
संस्कृती महोत्सव : प्रदर्शनस्थळी कलाप्रदर्शनाचेही आयोजन
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये कणेरी मठावर भारतीय संस्कृती महोत्सव-२०१५ अंतर्गत काडसिद्धेश्वर स्वामींच्या संकल्पनेतून छत्रपती शाहू दालन साकारले आहे. कोल्हापुरातील कलाकारांच्या २१ प्रकारच्या कलाकृती या दालनात असणार आहेत. अशा पद्धतीचे हे पहिलेच शाहू चरित्र प्रदर्शन भरत असून, हे प्रदर्शन १८ ते २५ जानेवारीपर्यंत सुरू राहील. याचे संयोजन शिवाजी मस्के यांनी केले आहे. प्रदर्शनस्थळीच कोल्हापूर कलापरंपरेचे कला प्रदर्शनही भरविण्यात येत आहे. याचे नियोजन चंद्रकांत जोशी यांनी केले आहे.
एकशे साठहून अधिक वर्षांची कलापरंपरा असणारे कोल्हापूर हे एकमेव शहर. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या राजाश्रयाने येथील कला बहरली. कोल्हापूर स्कूलचा नावलौकिकही देशात पसरला आहे.
कलातपस्वी आबालाल रहमान, रावबहादूर धुरंधर, दत्तोबा दळवी, बाबूराव पेंटर, चांगदेव शिगावकर, माधवराव बागल, चंद्रकांत मांडरे, गणपतराव वडणगेकर, टी. के. वडणगेकर, गोसावी, रवींद्र मेस्त्री, पी. सरदार, जी. कांबळे यांचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतरही निसर्ग, व्यक्तिचित्रे, पोस्टर, शिल्प आणि कॅलेंडर असा पाच कलांचा प्रवाह पुढे अखंड सुरू राहिला आहे. कोल्हापूरने परंपरा जपताना बदलत्या काळाबरोबर बदल आत्मसात केले आहेत.