छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाच्या दुसऱ्या टप्यातील कामाचा प्रारंभ
By भारत चव्हाण | Published: June 26, 2023 01:35 PM2023-06-26T13:35:10+5:302023-06-26T13:35:30+5:30
सुमारे साडेनऊ कोटींच्या या कामाला उध्दव ठाकरे सरकारच्या काळात मंजूरी मिळाली होती, तर सामाजिक न्याय विभागाकडून हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाह महाराज समाधी स्मारक स्थळाच्या दुसऱ्या टप्यातील कामाचा शुभारंभ सोमवारी पालकमंत्री दिपक केसरकर व छत्रपती शाहू यांच्या हस्ते झाला. सुमारे साडेनऊ कोटींच्या या कामाला उध्दव ठाकरे सरकारच्या काळात मंजूरी मिळाली होती, तर सामाजिक न्याय विभागाकडून हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडीक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता नारायण भोसले, आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव, माजी नगरसेवक अशोक जाधव, जय पटकारे, राहुल चिकोडे व शाहूप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
शहरातील सी वॉर्डातील नर्सरी बाग येथील जागेत पहिल्या टप्यात महापालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाधी स्मारक बांधले आहे. यामध्ये समाधी स्मारकावरील मेघडंबरी, समाधी परिसराभोवती संरक्षक भिंत, लॅण्डस्केपिंग व विद्युतीकरण ही कामे करण्यात आली आहेत. यासाठी महापालिकेने स्वनिधीमधून दोन कोटी ७६ लाख २३ हजार ३१४ इतका निधी खर्च केला आहे.
दुसऱ्या टप्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह नुतनीकरण तसेच त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनावर कलादालनाची निर्मिती करणे, समाधी स्थळाला संरक्षक भिंत बांधणे, पादचारी मार्ग करणे, लॅण्डस्केपिंग करणे, स्वच्छतागृहाची सुविधा, वाहनतळाची सुविधा, या परिसरातील ऐतिहासिक समाधी वास्तूंचे संवर्धन, दुरुस्ती व डागडुजी करणे व विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून नऊ कोटी ४० लाख ५६ हजार १०८ इतका निधी महापालिकेस प्राप्त झाला आहे.