छत्रपती शिवाजी चौकाचे लवकरच सुशोभीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2016 12:58 AM2016-12-24T00:58:31+5:302016-12-24T00:58:31+5:30
ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार : एक कोटींचा निधी मंजूर; सहा महिन्यांत काम पूर्ण करणार
कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचा, चळवळी आणि लढ्यांचा साक्षीदार बनलेल्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार असून, त्याकरिता एक कोटींचा निधी, तसेच महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितली. येत्या १५ दिवसांत सुशोभीकरणाचे काम सुरू करून सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या आराखड्याप्रमाणे सुशोभीकरणास एक कोटी रुपये खर्च येणार असला तरी जनतेच्या या शक्तिस्थळास ऐतिहासिक रूप देताना आणखी काही निधी लागला तरी तो देण्याची आपली तयारी आहे. कामास निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाहीही आमदार क्षीरसागर यांनी यावेळी दिली. महापौर हसिना फरास यांनी महानगरपालिकेवर जी जबाबदारी पडेल ती पूर्ण केली जाईल. या कामास महापालिकेचे संपूर्ण सहकार्य राहील, असे सांगितले.
आमदार क्षीरसागर यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून चौकाची दुरवस्था झाली आहे. पुतळ्याभोवती असणारे लोखंडी कठडे तुटलेले आहेत. अनेक लढ्यांचे, तसेच युवकांचे स्फूर्तिस्थान असलेल्या चौकाच्या दुरवस्थेबाबत शहाजी तरुण मंडळाने आपणाला भेटून निवेदन दिले. तसेच सुशोभीकरणास निधी देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे आपण हे काम त्वरित हातात घेतले. उद्योगमंत्री सुभाष देसाई व खासदार अनिल देसाई यांनी ५० लाखांचा निधी दिला असून, उर्वरित ५० लाखांचा निधी आपल्या आमदार फंडातून दिला जाणार आहे.
असे असेल सुशोभीकरणसध्याची स्मारकाची उंची १३ फूट असून, ती १६ फुटांपर्यंत वाढविणार.
चबुतरा ग्रॅनाईडमध्ये करण्यात येईल व त्यास ज्योतीसारखा आकार असेल.
चबुतऱ्याच्या पुढील भागावर शिवमुद्रा असेल.
ट्राय कलरमध्ये (तीन रंगांत) लाईट इफेक्ट असेल.
४पुतळ्याच्या मागील बाजूने धातूची मजबूत व गोलाकार भिंत असेल.
४ भिंतीवर छत्रपतींचा थोडक्यात मराठी व इंग्रजीमध्ये इतिहास लिहिलेला असेल.
४या स्मारकाच्या उजव्या बाजूला प्रतीकात्मक एक मावळा असेल.
४ स्फूर्तिस्थळ, स्मारक त्याचबरोबर पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित होईल.
शिवराज्याभिषेक दिन
६ जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळासाजरा करण्यात येणार आहे. छत्रपतींचा इतिहास पुन्हा एकदा जनतेसमोर मांडण्याचा आपला प्रयत्न राहील. नवीन सुशोभीकरणाचे अनावरणही त्याच दरम्यान करण्यात येईल, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.मावळा कोण? नाव सांगा...
आर्किटेक्ट सूरज जाधव यांनी शिल्पाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर पुतळ्याशेजारी एका मावळ्याची प्रतिकृती असणार आहे, असे सांगितले. त्यावर जयदीप शेळके यांनी मावळा कोण असणार? त्याचे नाव जाहीर करा, अशी मागणी केली. त्यावर जाधव यांनी मावळा हा मावळाच असेल, असे मोघम उत्तर दिले. त्यावेळी शेळके यांनी ‘दादोजी कोंडदेव तेथे असता कामा नये’, अशी भूमिका मांडली. यावेळी बंडा साळोखे यांनी तत्काळ विरोध का?अशी विचारणा केली. प्रकरण चिघळेल म्हणून क्षीरसागर यांनी त्यात हस्तक्षेप केला