छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरसेनापती - प्रा. नितीन बानुगडे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 01:40 PM2023-02-16T13:40:23+5:302023-02-16T13:40:56+5:30
महाराजांनी तयार केलेले मंत्रिमंडळ, न्यायव्यवस्था, गुप्तहेर यंत्रणा, व्यवस्थापन हे आजही मार्गदर्शक
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज हे १७ व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरसेनापती होते, असे मत प्रसिद्ध वक्ते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले. जिल्हा बार असोसिएशनतर्फे शिवजयंतीनिमित्त न्यायसंकुल आवारात शिवचरित्र या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, छत्रपती शिवरायांना वडील छत्रपती शहाजीराजे यांनी वयाच्या १२ व्या वर्षी भगवा ध्वज दिला. महाराजांनी पहिली सहकारी संस्था उभारली, तिचे नाव स्वराज्य होते. स्वराज्य उभारताना महाराजांनी नॅशनल कॅरॅक्टर तयार केली. महाराजांनी तयार केलेले मंत्रिमंडळ, न्यायव्यवस्था, गुप्तहेर यंत्रणा, व्यवस्थापन हे आजही मार्गदर्शक आहेत. स्वराज्य स्थापन करताना महाराजांना मिळालेले मावळे हे स्वराज्यासाठी ध्येयवेडे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र आजच्या तरुण पिढीला आदर्शवत आहे.
बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे, उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. विजय ताटे-देशमुख, जिल्हा सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल, ॲड. संदीप चौगुले, ॲड. संकेत सावर्डेकर, ॲड. तृप्ती नलवडे यांच्यासह माजी अध्यक्ष, वकील सभासद उपस्थित होते. ॲड. सुधीर चव्हाण यांनी आभार मानले. असोसिएशनचे सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख यांनी स्वागत केले.