संस्कृतीरक्षणाचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना; श्री श्री रविशंकर यांचे गौरवउद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 12:42 PM2023-02-01T12:42:35+5:302023-02-01T12:43:33+5:30
कोल्हापूर : आपल्या मनामनात असलेल्या भक्तीवर ताणतणावामुळे धूळ साठली आहे. निखाऱ्यावर राख धरली आहे. या भक्तिभावाच्या अभावामुळेच मानसिक अस्वस्थता ...
कोल्हापूर : आपल्या मनामनात असलेल्या भक्तीवर ताणतणावामुळे धूळ साठली आहे. निखाऱ्यावर राख धरली आहे. या भक्तिभावाच्या अभावामुळेच मानसिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही धूळ, राख झटका आणि मग प्रेमाच्या लाटा उसळत असल्याचा अनुभव घेत आपले जीवन सफल करा, असे आवाहन श्री श्री रविशंकर यांनी केले.
साधकांच्या प्रचंड गर्दीने भरलेल्या तपोवन मैदानावर मंगळवारी रात्री रविशंकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील बाराही तालुक्यातून आणि शेजारील जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या २५ मिनिटांच्या मनोगतामध्ये रविशंकर यांनी सुखी जीवनाची किल्लीच सांगितली. आपले जीवन क्षणिक आहे. काळ वेगाने पुढे जात आहे. या मर्यादित जीवनाला सांभाळणारी कला आपल्याला आत्मसात करावी लागेल. मनातील भक्तिभाव जागृत केल्यानंतर येणाऱ्या आव्हानांना पेलण्याचीही ताकद तुम्हाला मिळेल. पंचमहाभूतांपासून शरीर बनले असले तरी आकाशाशी आपले नाते हवे. आपले सुखाचे आकाश कोरडे पडले आहे. त्याला भक्तीचे सिंचन केले तर आयुष्यात सफलता मिळेल.मी बारा वर्षांपूर्वी कोल्हापूरला आलो हाेतो. तेव्हा ‘अभंगनाद’चे सादरीकरण झाले होते. आता हा भक्तीचा कुंभमेळा या ठिकाणी भरला आहे.
रविशंकर यांचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी भक्तिगीते, मर्दानी खेळ, विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सव्वासात वाजता रविशंकर यांना वाजत गाजत व्यासपीठावर आणण्यात आले. सर्वांना हात हलवून अभिवादन करण्यासाठी ते रॅम्पवरून उपस्थितांमध्ये आल्यानंतर त्यांची छबी टिपण्यासाठी महिला, पुरुष मोठ्या संख्येने उठून उभे राहिले. कोणी त्यांना मोरपीस देत होते, कोणी हार देत होते. या सर्वांच्या प्रेमाचा स्वीकार करून त्यांनी नंतरच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. शेतकऱ्यांच्या दाम्पत्याच्या हस्ते गुळाची ढेप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय संस्कृती वाचवण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना
रविशंकर म्हणाले, महाराष्ट्रात तुकाराम, ज्ञानेश्वरांसारखे अनेक संत होऊन गेले. वीर झाले. छत्रपती शिवाजी महाराज तर भवानीचे निस्सिम भक्त होते. माता, पिता, गुरुदेव आणि संतांचा सन्मान कसा करावा हे शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिले. ही भारतीय संस्कृती वाचवण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांनाच जाते, अशा शब्दात रविशंकर यांनी महाराजांचा गौरव केला. त्यांच्यामुळेच तामिळनाडूपासून ते श्रीलंकेपर्यंतही मराठ्यांचा दबदबा होता.
नेटके संयोजन
या महासंत्सगासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार हे गृहीत धरून नेटके संयोजन करण्यात आले होते. परंतु अनेकांना पासवरून नेमके कुठे जायचे कळत नव्हते, त्यामुळे प्रवेशव्दारांवर गर्दी झाली. खिद्रापूर येथील काेपेश्वर मंदिराचा मोठा फ्लेक्स व्यासपीठावर लावण्यात आला होता. एका बाजूला अंबाबाई तर दुसऱ्या बाजूला जोतिबाच्या प्रतिकृती स्थापित करण्यात आल्या होत्या.
नि:शब्द तपोवन
आपल्या मनोगतानंतर रविशंकर यांनी सर्व उपस्थितांना ध्यान करण्याची सूचना केली. त्याबरोबर संपूर्ण मैदान शांत झाले. त्यांच्या सूचनेनुसार उपस्थित ध्यान प्रक्रिया करत होते आणि महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे तपोवन मैदान पंधरा मिनिटांसाठी नि:शब्द झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.