छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि कोहिनूर हिरा परत आणू, चंद्रकांत पाटीलांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 09:57 PM2023-04-01T21:57:28+5:302023-04-01T21:59:24+5:30
कोल्हापूर : ज्या ब्रिटिशांनी भारताला दीडशे वर्षे गुलामगिरीत ठेवले, त्या देशाला आपल्या देशाने आर्थिक विकासाच्या क्रमवारीत मागे टाकले आहे. पाचव्या ...
कोल्हापूर : ज्या ब्रिटिशांनी भारताला दीडशे वर्षे गुलामगिरीत ठेवले, त्या देशाला आपल्या देशाने आर्थिक विकासाच्या क्रमवारीत मागे टाकले आहे. पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारताने पहिल्या क्रमांकाकडे वेगाने वाटचाल सुरु केली आहे. या टप्प्यावर त्यांच्याकडे असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि भारताचा मानबिंदू असलेला कोहिनूर हिरा पुन्हा परत आणू असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.
कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या खुल्या सभागृहात तंत्रनिकेतनच्या २८ व्या पदविका प्रदान समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे तंत्रशिक्षणचे विभागीय सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव होते. मयूरा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक रवी डोली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. मान्यवरांच्या हस्ते तंत्रनिकेतनमधील विविध शाखेतील ६०५ स्नातकांना पदविका प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
कोल्हापूरातील पहिले सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय जूनपासून सुरु होत आहे. यासाठी बार्टीकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाले असून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारातील वसतीगृहाची दहा एकर जागा लवकरच ताब्यात मिळणार आहे. एआयसीटीईचे पथक लवकरच प्रत्यक्ष भेट देणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
नव्या कॉलेजच्या जागेची पाहणी -
नव्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालाची इमारत जेथे बांधण्यात येणार आहे, त्या जागेची पाहणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुपारी केली. यावेळी नवीन शैक्षणिक वर्षात कामकाज सुरु करण्यासाठी आवश्यक गोष्टी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यांच्यासोबत प्राचार्य डॉ. डी. एम. गर्गे, सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता संजय जाधव, करवीरचे प्रांत वैभव नावडकर उपस्थित होते.
यांनी घेतल्या पदविका -
स्थापत्य अभियांत्रिकी : १५१ (मे), १२ (डिसेंबर) : १६३
यंत्र अभियांत्रिकी : १६५ (मे), ४ (डिसेंबर) : १६९
विद्युत अभियांत्रिकी : ६५ (मे), ४ (डिसेंबर) : ६९
औद्योगिक अणुविद्युत : १३ (मे), १ (डिसेंबर) : १४
अणुविदयुत व दूरसंचार : ७६ (मे), १४ (डिसेंबर) :९०
शर्करा तंत्रज्ञान : २ (मे) : २
माहिती तंत्रज्ञान : ७६ (मे) : ७६
धातू अभियांत्रिकी : २० (मे), २ (डिसेंबर) : २२
एकुण : ५६८ (मे), ३७ (डिसेंबर) : ६०५