छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मनात रुजवा --मेजर गजेंद्र प्रसाद; शिवाजी पदभ्रमंती मोहिमेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 05:49 PM2018-11-29T17:49:44+5:302018-11-29T17:55:20+5:30
पन्हाळागड ते विशाळगड या पदभ्रमंती मोहिमेतून छात्रांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासकालीन आठवणी आणि स्मृती जोपासून छत्रपतींच्या इतिहास आणि कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षणाबरोबरच संस्कार, चारित्र्य आणि शौर्याचा ऐतिहासिक ठेवा मनात रुजवावा, या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन केले आहे,
कोल्हापूर : पन्हाळागड ते विशाळगड या पदभ्रमंती मोहिमेतून छात्रांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासकालीन आठवणी आणि स्मृती जोपासून छत्रपतींच्या इतिहास आणि कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षणाबरोबरच संस्कार, चारित्र्य आणि शौर्याचा ऐतिहासिक ठेवा मनात रुजवावा, या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन अॅडिशनल डायरेक्टर जनरल महाराष्ट्र राज्य एन.सी. सी.चे मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांनी केले.
अखिल भारतीय शिवाजी पदभ्रमंती शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. २५० छात्रांची पहिली तुकडी या मोहिमेतील पहिल्या टप्प्याकडे रवाना झाली. शिवाजी विद्यापीठ येथील एन. सी. सी. भवन येथून या मोहिमेस प्रारंभ झाला. मेजर जनरल गजेंद्र प्रसाद म्हणाले, पदभ्रमंतीमध्ये सर्व कॅडेटस्नी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून या मोहिमेचा पूर्ण अनुभव घ्यावा. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून छत्रपतींच्या इतिहासाच्या आठवणी, चरित्र आणि कार्यातून तरुणांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल.
या शिबिराचे नियोजन ५ महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियनतर्फे करण्यात आले आहे. ही मोहीम ८ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. देशभरातील एक हजार छात्र शिबिरात सहभागी होणार आहेत. यासह श्रीलंकेतून सहा छात्र व एक आॅफिसर सहभागी होणार आहेत. पन्हाळा, बांबवडे, शाहूवाडी, पांढरेपाणी, गजापूरसह विशाळगड येथे मोहिमेचा समारोप होणार आहे. हे ५२ किलोमीटर अंतर ते पाच दिवसांत पूर्ण करणार आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये २५० छात्रांचा समावेश आहे. पहिल्या तुकडीमध्ये दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्रातील छात्रांचा समावेश होता.
याप्रसंगी ग्रुप कमांडर एन. सी. सी. ब्रिगेडियर आर. बी. डोग्रा, ५ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. कोल्हापूरचे कर्नल आर. के. तिम्मापूर, मेजर व्ही. जे. कांबलीमठ, ‘सीपीआर’चे डीन डॉ. सुधीर नणंदकर, सुभेदार मेजर माणिक थोरात, स्टेशन हेडक्वार्टर कोल्हापूरचे कर्नल एस. वाय. शिंदे, एन. सी. सी. आॅफिसर बाजीराव भोसले, एन. सी. सी. आॅफिसर, सुभेदार, पी.आय. स्टाफ, सिव्हिल स्टाफ, कर्मचारी उपस्थिती होते.
कोल्हापुरातील एन.सी.सी. भवन येथे अखिल भारतीय शिवाजी पदभ्रमंती शिबिरास झेंडा दाखवून उद्घाटन करताना मेजर जनरल गजेंद्र प्रसाद, एन. सी. सी. ब्रिगेडिअर आर. बी. डोग्रा, कर्नल आर. के. तिम्मापूर, मेजर व्ही. जे. कांबलीमठ, डॉ. सुधीर नणंदकर, आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय शिवाजी पदभ्रमंतीसाठी गुरुवारी कोल्हापुरातील एन.सी.सी. भवन येथून पहिली तुकडी पन्हाळ्याकडे रवाना झाली.