चिकोडे ग्रंथालयाने जपले सामाजिक भान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2016 12:39 AM2016-12-26T00:39:36+5:302016-12-26T00:39:36+5:30
तेरा वर्षांत विविध उपक्रम : रक्तदान शिबिर, मुलांसाठी देशभक्तिपर चित्रपटांचे आयोजन
समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर
ग्रंथालय म्हणजे पुस्तकांचे आगार. त्यातून वाचक आपल्याला हवे ते पुस्तक नेणार आणि वाचून परत आणून देणार. रोजची दैनिके वाचण्यासाठी वाचक गर्दी करणार; पण याही पलीकडे जाऊन एक ग्रंथालय वैविध्यपूर्ण उपक्रम किती समर्थपणे राबवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून जरगनगर येथील कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाकडे पाहावे लागेल.
राहुल चिकोडे हा स्वभावाने कार्यकर्ता असलेला. प्रशासनामध्ये अधिकारी म्हणून काम केलेल्या आपल्या दिवंगत वडिलांच्या नावे काही तरी करण्याची त्याची इच्छा होती. त्याच्या वडिलांना वाचनाची मोठी आवड म्हणूनच राहुल यांनी त्यांच्या नावे ग्रंथालय सुरू करण्याचा संकल्प सोडला. आपल्या घराच्या बाजूला असणाऱ्या गाडी लावण्याच्या शेडमध्ये २००३ मध्ये त्यांनी सुरुवातीला सर्व दैनिके वाचनासाठी ठेवली. उद्घाटन झाले आणि वाचकांची दैनिक वाचनासाठी गर्दी होऊ लागली.
दैनिके झाली आता पुस्तके ठेवणार का, अशी विचारणा होऊ लागली. अशातच नरेंद्र जाधव यांचे ‘मी आणि माझा बाप’ हे पुस्तक राहुल यांच्या वाचनात आले. ‘त्यातील कुटलं बी काम कर, खरं त्यात टापला जायला पाहिजे’ हे वाक्य त्यांच्या मनावर कोरलं गेलं. एकच क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात चांगली काही तरी करून दाखवायचा निर्धार त्यांनी केला. ‘ग्रंथालयासाठी वाटेल ते’ या भूमिकेतून त्यांनी कार्यरत असणाऱ्या पदांचाही राजीनामा दिला आणि गं्रथालयाच्या उभारणीसाठी झोकून दिलं.
घरातील पुस्तकं ग्रंथालयात आली. कुणाकडंही जाऊन पुस्तकांचं दान मागितलं जाऊ लागलं. हे सर्व करताना स्वत:चं वाचन वाढवलं. विविध क्षेत्रांतील नागरिकांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि पाहता-पाहता चिकोडे ग्रंथालय वाचकप्रिय होऊ लागलं. आज स्वमालकीच्या सुसज्ज इमारतीत ग्रंथालय सुरू आहे. स्पर्धा परीक्षा, बालविभाग सुरू आहे. महिलांसाठीही अनेक पुस्तकं असून आरोग्यावरही आधारित पुस्तकेही येथे उपलब्ध आहेत.
ग्रंथालयाने रक्तदान शिबिराच्या आयोजनामध्ये सातत्य ठेवले असून महिन्याभरापूर्वी झालेल्या शिबिरात ३७८ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. मुला-मुलींसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्या सहकार्याने ‘चित्रपट प्रदर्शन’ हा एक नवा उपक्रम ग्रंथालयाने सुरू केला आहे. मुलांना चांगले चित्रपट पाहायला मिळत नाहीत हे वास्तव आहे म्हणूनच पहिल्या रविवारी मुलांसाठी देशभक्तिपर चित्रपटांचे आयोजन करण्यात आले होते तर तिसऱ्या रविवारी मोठ्यांसाठी चित्रपट दाखविले जातात. शेअर्सची तोंडओळख करून देणे, आॅनलाईन ओळखपत्रे यासारखेही उपक्रम ग्रंथालयाने राबविले आहेत.
दोन वर्षांपूर्वीच्या भीषण दुष्काळावेळी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे संकलन करण्यात ग्रंथालयाने पुढाकार घेतला. जरगनगर उपनगर परिसरामध्ये सेवानिवृत्त नागरिकांची, ज्येष्ठ नागरिकांची मोठी संख्या आहे. या सर्व मंडळींना या भागामध्ये या ग्रंथालयाच्यावतीने उत्तम ग्रंथ सेवा दिली जात असल्याने त्यांची मोठी सोय झाली आहे. मात्र, अजूनही युवकवर्ग म्हणावा तितका वाचनाकडे वळत नाही म्हणूनच ते एक मोठे आव्हान असल्याचे मानले जाते. ग्रंथालयाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करून युवावर्गालाही वाचनसंस्कृतीकडे आकृष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
दर्जेदार पुस्तकांचा आग्रह
राहुल चिकोडे म्हणाले, की आजही वेळात वेळ काढून मी ग्रंथालयामध्ये तासभर बसतोच. अनेक सवलतीच्या पुस्तकांच्या योजना असताना त्यांना बळी न पडता दर्जेदार आणि वाचकांना आवडतील अशी पुस्तके आणण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न सुरू असतात. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे या ग्रंथालयाच्या कामाकडेही बारीक लक्ष आहे. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांनीही ग्रंथालयासाठी मोठी मदत केली आहे. वाचकांनाही ग्रंथालयाचे हे योगदान आता मान्य झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आम्ही चहाचे पैसे देऊ का, अशी उत्स्फूर्त विचारणा होत असते. अगदी वाढदिवसाचे पैसे बचत करून ते ग्रंथालयासाठी देणगी म्हणून देणारीही अनेक मुले आहेत.