कडकनाथ फसवणूकप्रकरणी मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 02:29 PM2019-12-11T14:29:10+5:302019-12-11T14:46:55+5:30
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महारयत अॅग्रो कंपनीतील मुख्य सूत्रधार सुधीर शंकर मोहिते याला जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केले. त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोल्हापूर : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महारयत अॅग्रो कंपनीतील मुख्य सूत्रधार सुधीर शंकर मोहिते याला जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केले. त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महारयत अॅग्रो कंपनीचे सुधीर मोहिते आणि संदीप सुभाष मोहिते (दोघेही रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कराराचे उल्लंघन करून त्यांनी २३५ शेतकऱ्यांना पाच कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घातला आहे. शहरातील स्टेशन रोडवरील कंपनीचे कार्यालय सील केले आहे.
शेकडो शेतकऱ्यांशी केलेली करारपत्रे ताब्यात घेतली आहेत. कंपनीची इस्लामपूर येथील खासगी बँकेतील दोन खाती सील केली आहेत. इस्लामपूर शहर पोलीस ठाण्यात महारयत अॅग्रो कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने येथील पोलिसांकडूनही तपास सुरू आहे.
कंपनीचा संचालक संशयित संदीप मोहिते आणि हणमंत शंकर जगदाळे (रा. अंबक-चिंचणी, ता. कडेगाव, जि. सांगली) यांची ११ सप्टेंबरला पोलीस कोठडीची मुदत संपली असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. संशयित आरोपींचा ताबा घेण्यासाठी इस्लामपूर न्यायालयाकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अर्ज केला होता. त्यातील सुधीर मोहिते याला चौकशीसाठी मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कळंबा कारागृहातून ताब्यात घेतले.
त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम आणि शाहूपुरी पोलीस करीत आहेत.