धुवाधार पाऊस, मेलेली जनावरे अन् अंधार; सीईओ संजयसिंह चव्हाणांनी अनुभवल्या धनगरवाड्यावरच्या वेदना

By समीर देशपांडे | Published: July 18, 2022 11:17 AM2022-07-18T11:17:50+5:302022-07-18T11:18:45+5:30

संजयसिंह चव्हाण हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी. लहानपणीच पोलिओ झाला होता. त्यामुळे एक पाय थोडा अधू. त्यामुळे सीईओ डोंगर चढून धनगरवाड्यावर काय जाणार असे सोबतच्या अधिकाऱ्यांना वाटले. परंतू..

Chief Executive Officer of Kolhapur Zilla Parishad Sanjay Singh Chavan went to Dhangarwada in Ajara to inspect the situation. | धुवाधार पाऊस, मेलेली जनावरे अन् अंधार; सीईओ संजयसिंह चव्हाणांनी अनुभवल्या धनगरवाड्यावरच्या वेदना

धुवाधार पाऊस, मेलेली जनावरे अन् अंधार; सीईओ संजयसिंह चव्हाणांनी अनुभवल्या धनगरवाड्यावरच्या वेदना

googlenewsNext

ऑन दि स्पॉट रिपोर्ट

समीर देशपांडे

कोल्हापूर : रविवार वेळ सकाळी दहाची. आजरा तालुक्यातील हरपवडेपैकी धनगरवाडा. वाड्यावर प्रवेश करतानाच मेलेली म्हैस ओढत नेली जात होती. फर्लांगभर आत गेल्यावर वासरूही मरून पडले होते. एकच गल्ली. गल्लीभर चिखल. मोजकीच घर पण घरभर अंधार. छपरावरच्या सोलर पॅनेलवरच जिथं शेवाळ धरलेलं तिथं प्रकाश कुठुन मिळणार. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक धनगरवाड्यांपैकी एका वाड्यावरचं हे एक प्रातिनिधीक चित्र. उदास करणारं. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही खिन्न करणारं.

चार दिवसांपूर्वी याच वाड्यावर लसीकरणासाठी जाणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा एक व्हीडीओ ‘लोकमत’नं प्रसारित केला. जिल्हा परिषदेचे संवेदनशील मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी तो व्हीडीओ पाहिला. त्याचक्षणी त्यांनी निर्णय घेतला की आपण या धनगरवाड्यावर जायचं. रविवारी सकाळी शासकीय अधिकाऱ्यांसह आजरा, पेरणोलीमार्गे सर्वजण नावलकरवाडीत दाखल झाले. तिथूनच जंगलातून चढण सुरू झाली. भर पावसात अंगातून घामाच्या धारा निघत होत्या अशी चढण. मधूनच येणारा पाउस. पाय सटकू द्यायचा नाही. झाडं. वेली, पायात येणारी झाडांची मुळं सगळं चुकवत पुढं पाय टाकायचा.

वाड्यावर एकच गल्ली. मोजकी घरं. कामटांनी गोठे झाकलेले. आत पाणी साठलेलं. घरात जमीनीला ओल आलेली. नाही म्हणायला जलजीवन मिशनमधून सायपनही योजना केलेली. उन्हाळयात पाणी कमी होतं. ते सर्वांना समान मिळावं म्हणून एकाच उचींवर पाईप घेउून पाण्याचं वितरण केलेलं. छपरावर सोलचे पॅनेल होते. परंतू ते बंद पडले होते. आता नवीन मंजूर होणार असं सांगण्यात आलं. जंगलातील लाकडं सरपण म्हणून. गॅस इथं पोहाचला नाही. रेशनवर धान्य मिळतं. पण रॉकेल बंद झालेलं. गाई, म्हशी बाळगून उदरनिर्वाह करणारे हे डंगे धनगर आणि त्यांची ही प्रातिनिधीक परिस्थिती.

तुमच्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते करू असं आश्वासन देवून सर्वजण परतीच्या मार्गाला लागतात. खडा डोंगर उतरताना एका बाजुला खोल दरी. पायातनं वाहणारं तांबडं पाणी आणि चुकुन पाय सटकलाच तर डोकचं फुटलं पाहिजे असे दगड. या धनगरवाड्यावरची माणसं कशी ये जा करत असतील असा विचार करत सर्वजण खाली येतात आणि या सर्वांच्या आयुष्यापेक्षा आपलं आयुष्य अधिक सुखी असल्याची प्रत्येकाला जाणीव होते.

रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, आजरा तहसिलदार विकास अहिर, प्र. गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे, उपअभियंता सुर्यकांत नाईक, बी. डी. माने, शाखा अभियंता चिंतामणी लोंढे, वनपाल बाळेश न्हावी, प्रियांका पाटील, ग्रामसेवक डी. एल. काळे, तलाठी व्ही. जे नाईक, आरोग्यसेवक नाईक मोरे, कमतगी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

जागेवरच पंचनामा

धनगरवाड्यावर प्रवेश करतानाच दोन बैल जुंपून कोंडिबा जानू झाेरे यांची मेलेली म्हैसे पुरायला पोरं निघाली होती. त्यांना सीईओ चव्हाण यांनी थांबवले. जागेवरच पंचनामा करण्यात आला. याची नुकसानभरपाई तुम्हांला मिळेल असं चव्हाण यांनी सांगून टाकलं. वाड्यावर आल्यावर तसेच. याच घरातील आणखी एक वासरूही मेलं हाेतं. तिथंही पंचनामा करण्यात आला.

राकेल तेवढं दयेवा बाबा

ग्रामस्थांना भेटलो. रस्ता नाही ते नाही. बाबा राकेल सुध्दा मिळत नाही. संध्याकाळ झाली की चुलीचाच उजेड. चिमणी कशी लावायची आणि कंदिल कसा लावायचा तुमीच सांगा बघू. सापाकिरड्याचं घरात काय घुसलं तर कसं कळायचं. ते सांगा. चिल्लीपिल्ली हायीत घरात. राकेल द्याला तुमाला काय होतंय. पोरं ओड्यातनं, रानटी जनावरांस्नी चुकवून शाळंत जात्यात. बाई घरात अभ्यास करा म्हंती. आता दिवाच नाही घरात तर ती तरी कसा अभ्यास करणार..तिथल्या गावडे मावशींनी विचारलेल्या या प्रश्नाला तिथे लगेचच उत्तर नव्हतं.

चव्हाण यांनी चुकवला सर्वांचा अंदाज

संजयसिंह चव्हाण हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी. लहानपणीच पोलिओ झाला होता. त्यामुळे एक पाय थोडा अधू. थोडं लंगडत चालावं लागतं. चालणं सोप व्हावं म्हणून ते विशिष्ट बूट वापरतात. त्यामुळे सीईओ डोंगर चढून धनगरवाड्यावर काय जाणार असे सोबतच्या अधिकाऱ्यांना वाटले. परंतू हातात एक काठी घेवून या बहाद्दर अधिकाऱ्याने अतिशय अवघड, खाचखळगे, खड्डे, निसरडे, पाणी असलेल्या वाटेतून अखेर धनगरवाडा गाठलाच आणि उपस्थितांना अक्षरश तोंडात बोटे घातली.

Web Title: Chief Executive Officer of Kolhapur Zilla Parishad Sanjay Singh Chavan went to Dhangarwada in Ajara to inspect the situation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.