मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट टाळली

By admin | Published: February 18, 2016 12:03 AM2016-02-18T00:03:38+5:302016-02-19T00:23:12+5:30

रिक्टोली ग्रामस्थांचे उपोषण सुरुच : रुग्णालयातून बाहेर पडलेले आंदोलनकर्ते पुन्हा उपोषणस्थळी

Chief Executive Officers avoided the visit | मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट टाळली

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट टाळली

Next

चिपळूण : रिक्टोली येथे नळपाणी योजना व्हावी, यासाठी २६/११च्या मुंबईवरील हल्ल्यातील शहीद शशांक शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शिंदे यांच्यासह रिक्टोलीचे ग्रामस्थ गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आजही हे आमरण उपोषण सुरुच आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बुधवारी रिक्टोली गावी जाऊन नळपाणी योजनेच्या वस्तुस्थितीची पाहणी केली. मात्र, उपोषणकर्त्यांना न भेटताच परस्पर निघून गेल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
रिक्टोली ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केल्यानंतर मंगळवारी सात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर लक्ष्मीबाई शिंदे यांच्यासह सर्वजण उपोषणस्थळी दाखल झाले. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शिवसेनेचे प्रताप शिंदे आदींनी घटनास्थळी भेट दिली. सभापती स्नेहा मेस्त्री या दुपारपर्यंत उपोषणकर्त्यांबरोबरच होत्या. यावेळी डॉ. पल्लवी कोदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनीही पर्यायी व्यवस्था मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, उपोषणकर्त्यांना हा तोडगा मान्य नाही.
मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश जंगम, गटविकास अधिकारी शुभांगी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, विस्तार अधिकारी प्रमोद केळस्कर, पाणी पुरवठा उपअभियंता व्यास व सर्व शाखा अभियंता त्यांच्याबरोबर होते. रिक्टोली गावात सध्या असणाऱ्या योजनेपासून ते अगदी गावातील इतर स्रोतांचीही त्यांनी पाहणी केली.
वस्तुस्थितीची पाहणी करताना रिक्टोली - मधलीवाडी येथील माजी सैनिक विधवांनी व महिलांनी देशभ्रतार यांना घेराओ घालून जाब विचारला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. गावातून फेरफटका मारुन आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना न भेटताच रत्नागिरीला जाणे पसंत केले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

उपोषणाला राजकीय रंग
रिक्टोली गावासाठी २०१३मध्ये मंजूर झालेली नळपाणी योजना मार्गी लागावी म्हणून ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे. या योजनेच्या अध्यक्षपदी पूर्वी शहीद शशांक शिंदे यांचे वडील होते. आजही या उपोषणात त्यांच्या मातोश्री सहभागी झाल्या आहेत. शहिदाचे गाव पाण्यापासून उपेक्षित असल्याने या उपोषणाबद्दल जनतेत सहानुभूती आहे. मात्र, गावातील विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने या उपोषणाला आता राजकीय रंग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी उपोषणकर्त्यांबरोबर आहेत, तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोधी गटाला पाठिंबा आहे. त्यामुळे ही योजना आता राजकीय साठमारीत सापडली असून प्रशासकीय चाळणीत आली आहे.

Web Title: Chief Executive Officers avoided the visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.