मुख्य सूत्रधार भिष्मा चव्हाण, विकास खंडेलवाल यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:36 AM2021-02-26T04:36:58+5:302021-02-26T04:36:58+5:30
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात भिंतीवरून मोबाइल, गांजा साहित्य फेकल्याप्रकरणी फरार असलेला मुख्य सूत्रधार भिष्मा ऊर्फ भीमा सुभेदार चव्हाण ...
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात भिंतीवरून मोबाइल, गांजा साहित्य फेकल्याप्रकरणी फरार असलेला मुख्य सूत्रधार भिष्मा ऊर्फ भीमा सुभेदार चव्हाण (२८, रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) व विकास ऊर्फ विकी रामआवतार खंडेलवाल (३५, रा. संग्राम चौक, इचलकरंजी) यांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत सात जणांना अटक केली. जयपाल किसन वाघमोडे (रा. वडीय रायबाग, ता. कडेगाव, जि. सांगली) हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोघांना रविवारपर्यंत पोलीस कोठडी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २२ डिसेंबर २०२० रोजी मध्यरात्री चारचाकी वाहनातून येऊन काहींनी कळंबा कारागृहाच्या भिंतीवरून आत तीन गठ्ठे फेकले. गठ्ठ्यांमध्ये दहा मोबाइल, गांजा, चार्जर वायर आदी साहित्य होते. कारागृहाची सुरक्षा यंत्रणा भेदून हे गठ्ठे कारागृहात पोहोचल्याने पोलीस खडबडून जागे झाले. पोलिसांनी गतीने तपास करत यापूर्वी ऋषिकेश सदाशिव पाटील (रा. कोदवडे, ता. राधानगरी), राजेंद्र दाद्या महादेव धुमाळ (रा. जयसिंगपूर), शुभम सोपान ऐवळे (रा. इचलकरंजी), ओमकार ऊर्फ मुरली दशरथ गेंजगे (रा. शहापूर, इचलकरंजी), शकील ऊर्फ शकलीन झाकीर गवंडी (इचलकरंजी) यांना अटक केली. तर तिघा फरार आरोपींपैकी भिष्मा चव्हाण याला अटक केली, तर संशयित विकास खंडेलवाल याचा कारागृहातून ताबा घेतला.
चिंचवाड फाटा येथे अटक
मोबाइलप्रकरणी इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक समांतर तपास करत होते, त्यांना फरार सूत्रधार भिष्मा चव्हाण हा जयसिंगपूर ते शिरोळ मार्गावर चिंचवाड फाटा येथे वावरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार त्याला सापळा रचून अटक केली. इचलकरंजीतील मोकांतर्गत कारवाईत कारागृहात असलेला संशयित विकास खंडेलवाल याच्यासाठीच हा गांजा, मोबाइल कारागृहात फेकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला पुणे येथील येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले.
फोटो नं. २५०२२०२१-कोल-भिष्मा चव्हाण (आरोपी-जेल)
फोटो नं. २५०२२०२१-कोल-विकास खंडेलवाल (आरोपी-जेल)