मुख्यमंत्री व पवार २६ जूनला कोल्हापुरात
By admin | Published: June 18, 2016 12:21 AM2016-06-18T00:21:34+5:302016-06-18T00:22:52+5:30
ग्रंथ प्रकाशन : शाहू जयंती सोहळ्यास उपस्थिती; विविध बैठकाही होणार
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे येत्या २६ जूनला कोल्हापूरात येत आहेत. शाहू जयंतीच्या निमित्ताने आयोजित महत्वाचे दोन ग्रंथ प्रकाशन समारंभ त्यांच्या हस्ते होत आहेत.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार संपादित शाहू महाराजांच्या जीवनकार्यावरील ग्रंथाचे हिंदीतील आवृत्तीच्या प्रकाशन सोहळा पवार यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. शाहूंचा कृतीशील वारसदार म्हणूनही यंदा पवार यांचा गौरव होणार आहे. पवार यांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रविवारी सकाळी ११ वाजता बैठक होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे ‘राजर्षी शाहू जीवनचरित्र ग्रंथा’च्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातर्फे २६ जूनला सकाळी ११ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव संपादित ‘राजर्षी शाहू जीवनचरित्र ग्रंथा’च्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस येत आहेत. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती आहे.
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळाला भेट देण्याबरोबरच न्यू पॅलेस येथे संभाजीराजे छत्रपती व कुटुंबीयांना भेटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)