किरकसालच्या कष्टाचं मुख्यमंत्र्यांकडून फेसबूकवर कौतुक
By admin | Published: May 20, 2017 05:10 PM2017-05-20T17:10:14+5:302017-05-20T17:10:14+5:30
शेकडो प्रतिक्रिया : दौऱ्यातील व्हिडिओ अन् श्रमदानाचे फोटो जगभरात पोहोचले
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. २0 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. जलसंधारणाची कामे सुरू असलेल्या माण, कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन त्यांनी पाहणी केली. किरकसाल ग्रामस्थांची जिद्द, कष्ट पाहून भारावलेले फडणवीस यांनी फेसबूक अकाउंटवर पोस्ट टाकली. पाहता पाहता त्याला हजारो लोकांनी लाईक केले असून शेकडोंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नवनवीन योजनांमध्ये सातारकरांनी नेहमीच यशाचा झेंडा फडकविला आहे. वॉटरकप स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने यापूर्वीच राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याप्रमाणे यंदाच्या वर्षी माण, कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटननिमित्ताने गुरुवारी साताऱ्यात आले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्यांनी जिल्ह्यात जलसंधारणाची कामे सुरु असलेल्या गावांने भेट देऊन कामाची पाहणी केली. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रूक, धामणेर. खटाव तालुक्यातील औंध व माण तालुक्यातील किरकसाल येथील काम पाहून ते भारावून गेले.
किरकसाल ग्रामस्थांच्या श्रमदानाने मोहिनी घातलेल्या फडणवीस यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवर काही फोटो व व्हिडिओ टाकून तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले, ह्यसातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील किरकसाल हे आणखी एक आदर्श गाव. अमोल काटकर हे अभियांत्रिकी पदविकाधाकर युवा सरपंच. गावातील नागरिकांना एकत्र करुन मोठे काम करत आहेत. या गावात दहा शेतकरी गट आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम होत आहे. या गावाला पाणी पुरवठा योजना जाही करताना मला अतिशय आनंद होत आहे. गेल्या ४५ दिवसांपासून प्रचंड उन्हात हे लोक परिश्रम करत आहेत. जलशोष खड्डे, एरिया ट्रीटमेंट, वृक्षारोपण आदी कामं मोठ्या प्रमाणात होत आहेत.
पाणी हे जीवन आहे. पाण्यासाठी काम हेच फार मोठे समाज आणि राष्टकार्य आहे. तुम्हा सर्वांना माझा सलाम!ह्ण असेही एका पोष्टमध्ये म्हटले आहे.
फुलांऐवजी शब्द उच्चाराने अनोखे स्वागत
मंत्र्यांच्या स्वागताला पायघड्या घालणे, भले मोठे पुष्पहार घातले जातात. पण माण तालुक्यातील किरकसालमध्ये फुलांऐवजी शब्दोउच्चाराने स्वागत करण्यात आले. हे पाहून आनंदीत झालेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनोख्या पद्धतीने स्वागत करण्याच्या पद्धतीचा व्हिडीओच टाकला आहे.