आमचे हिंदुत्व लोकांचे अश्रू पुसणारे - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 11:46 AM2024-10-02T11:46:03+5:302024-10-02T11:46:21+5:30
सिद्धगिरी मठावर 'संत समावेश' कार्यक्रमाचा समारोप
गोकुळ शिरगाव : आमचे हिंदुत्व हे बेगडी नसून, लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे आहे. आमच्या सरकारमध्ये साधु-संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिला. कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावर आयोजित संत समावेश कार्यक्रमाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे काही लोकांना पचनी पडत नाही. हिंदू धर्माच्या उत्थानासाठी जे जे करावे लागेल त्यासाठी सरकार सक्षम आहे. राज्याचे आणि देशाचे एकात्मिकरण जोपासायचे असेल तर या धर्मसंमेलनासारखी जनजागृती करणे आवश्यक आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना पालघरमध्ये दोन साधूंचे हत्याकांड झाले. त्यावेळी तत्कालीन सरकार गप्प होते. आमच्या सरकारमध्ये साधुसंतांच्या केसालाही हात लागू देणार नाही.
यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, प्रताप कोंडेकर, रामगिरी महाराज, अक्षय महाराज भोसले, राणा महाराज वास्कर उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळ येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
माझ्या पाठीशी जनता, आध्यात्मिक साधूंचे आशीर्वाद
राज्यात तीर्थक्षेत्र योजना, गडकोट किल्ल्यांचे संवर्धन, युनोस्कोमध्ये १४ किल्ल्यांची नोंद होण्यासाठी या सरकारने सकारात्मक पावले उचलली. मी स्वतः १८-१८ तास काम करतो. माझ्या पाठीशी जनता, आध्यात्मिक साधू-संत, महंतांचे आशीर्वाद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. देशाच्या एकूण गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आणल्याचा दावा त्यांनी केला.
मड्याच्या टाळूवरचे लोणी कोण खाते
बदलापूरच्या आरोपीला फाशी द्या असे विरोधक म्हणत होते अन् दुसरीकडे कोर्टात जात होते. मड्याच्या टाळूवरचे लोणी खायचे काम कोण करते? हे आता जनतेनेच ओळखावे, या शब्दात शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
'सुरक्षित बहीण' योजना आणणार
राज्यातल्या माझ्या माता-भगिनीकडे कोणी वाकड्या नजरेने बघितले, अन्याय- अत्याचार केले तर त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नाही. यासाठी सुरक्षित बहीण योजना लवकरच आणणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.
झुलवत ठेवणाऱ्यांना हक्क मागण्याचा अधिकार नाही
राज्यातील जनतेला आताच्या विरोधकांनी इतकी वर्ष झुलवत ठेवलं, ज्यांनी फक्त त्यांच्या मतांचा वापर केला आणि सत्ता भोगली त्यांना हक्क मागण्याचा अधिकार नाही या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ‘राष्ट्रवादीच्या हक्क मागतोय महाराष्ट्र’ या अभियानाची खिल्ली उडवली. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे काम आणि त्यांचे काम याची तुलना करा, आम्ही केलेल्या योजना, निर्णय याची बरोबरी करा आणि मग बोला. कुणाचे सरकार सर्वसामान्यांसाठी निर्णय घेते हे जनतेला माहीत आहे. यामुळेच महायुती आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजयी होणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. गेल्या दोन ते अडीच वर्षाच्या कार्यकाळात आम्ही कल्याणकारी योजना आणल्या आहेत.