कोल्हापूरकरांनी लोकसभेला जोडा दाखवला, विसरलात का?; सतेज पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 03:28 PM2024-08-24T15:28:47+5:302024-08-24T15:29:36+5:30
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय बोलतात, हे त्यांनाच समजत नाही'
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय बोलतात, हे त्यांनाच समजत नाही. विरोधकांना जोडा दाखवा म्हणणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत सहा दिवस येथे तळ ठोकूनही कोल्हापूरकरांनीच जोडा दाखवला हे ते विसरले आहेत, असा पलटवार काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला. शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळल्याची घोषणा करून आंदोलनात फूट पाडण्याचा डाव असून, हा लढा सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूरबंदच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेस कमिटीत आयोजित बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह युती सरकारवर निशाणा साधला. आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूरकरांना प्रेमाने, आपुलकीने व बंधुभावाने जिंकता येते. पण, मुख्यमंत्र्यांची भाषा काय आहे? लोकसभेला १०० टक्के येथील जनतेने दाखवून दिले, आगामी निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होईल. कोल्हापूरकरांचा दणका पाहून शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. हा आंदोलनात फूट पाडण्याचा डाव असून, कोल्हापूरकर लढा चालूच ठेवणार आहेत.
अशांत कोल्हापूरचा प्रयत्न
मध्यंतरी मुंबईत एक उद्योगपती भेटल्यानंतर त्यांनी विचारले ‘कोल्हापूर शांत आहे ना?’ यावरून ‘अशांत कोल्हापूर’ अशी प्रतिमा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला.
जनसुरक्षा कायद्याविषयी वकील परिषद
लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरायचे नाही, असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा असून, जनसुरक्षा कायदा किती चुकीचा आहे? याविषयी प्रबोधन करण्यासाठी लवकरच वकील परिषदेचे आयोजन केले जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
पोलिसांकडून मृतदेहाची विटंबना
शिये येथील दहा वर्षीय बालिकेच्या लैंगिक अत्याचार खून प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत उध्दवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, मृतदेह २४ तास पंचनाम्याविना सीपीआरमध्ये ठेवला जातो, ही मृतदेहाची विटंबना आहे.