मुख्यमंत्र्यांची कोल्हापुरात रात्री उशिरापर्यंत खलबते, दोन्ही मतदारसंघांचा घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 11:56 AM2024-04-27T11:56:45+5:302024-04-27T11:57:35+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीचाही आढावा घेतला
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री कोल्हापूरमध्ये दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत त्यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांसमवेत चर्चा केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील राजकीय स्थितीचा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीचाही आढावा घेतला.
शिंदे यांचे रात्री सव्वाआठच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यानंतर ते तपोवन मैदानावर आले. या ठिकाणी त्यांनी सभामंडपाच्या उभारणीच्या कामाची पाहणी केली. यानंतर हॉटेलवरच त्यांनी रात्री उशिरापर्यंत एकूणच निवडणुकीच्या प्रचाराचा आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे हॉटेलवर स्वागत केले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे उपस्थित होते. रात्रीच्या चर्चेत उशिरा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, संजय मंडलिक, धैर्यशील माने सहभागी झाले. यावेळी जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, रवींद्र माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सातत्याने फोनवर
मुख्यमंत्री शिंदे हे तपोवन येथे आल्यानंतर दहा मिनिटे गाडीतूनच कोणाशी तरी बोलत होते. यानंतर त्यांनी व्यासपीठावरून मंडप उभारणीची पाहणी केली. त्यानंतर पुन्हा पंधरा मिनिटे त्यांचा फोन सुरू होता. आल्यानंतर त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशीही स्वतंत्रपणे चर्चा केली.
डोंगळेंनी घेतली तपोवनवर भेट
‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी निवेदनासह मुख्यमंत्री शिंदे यांची तपोवनवर भेट घेतली. यावेळी मंत्री उदय सामंत आणि संजय मंडलिक यांना सोबत घेऊन त्यांनी डोंगळे यांच्या विषयावर चर्चाही केली.
मोदी यांची सभा विक्रमी होईल
नरेंद्र मोदी यांची सभा विक्रमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले, मतदारांमध्ये महायुतीबद्दल चांगली भावना आहे. नरेंद्र मोदी यांचा आणि आम्ही राज्यातील घेतलेले अनेक क्रांतिकारी निर्णय यामुळे आम्ही विकासाच्या मुद्यावर लढत आहोत. मतदानानंतरच्या मतदारांच्या भावना पाहता आम्हाला राज्यात उत्तम यश मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांची टीम सक्रिय
एकूणच कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन जागांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची ठाणे, मुंबईची टीम येथे गेली काही दिवस कार्यरत असून याचे सर्व सदस्य रात्री तपोवनवर उपस्थित होते. याच टीमकडून शिंदे यांनीही रात्री उशिरा माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
तपोवनवरील अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
तपाेवनवरील तयारीची पाहणी करून हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, धनंजय महाडिक बाहेर पडल्यानंतर हॉकी स्टेडियमपासून पावसाला सुरुवात झाली. एकीकडे तपोवनवरील सभेसाठी शेकडो कामगार मंडप उभारणी, प्रकाश योजना, ध्वनी यंत्रणा यासाठी कार्यरत असताना तिकडे मात्र एक थेंबही पाऊस न पडल्याने तेथील अधिकारी आणि मोठ्या संख्येने असलेल्या पोलिसांनी तसेच मंडप उभारणी करणाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.