मुहूर्त ठरला! मुख्यमंत्री शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही लोकसभा मतदारसंघांत मेळावे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 12:01 PM2023-12-29T12:01:18+5:302023-12-29T12:01:41+5:30
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने कंबर कसली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ६ जानेवारीपासून राज्यभरात १६ ...
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने कंबर कसली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ६ जानेवारीपासून राज्यभरात १६ लोकसभा मतदारसंघांत मेळावे घेण्यात येणार आहेत. २९ जानेवारीला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आणि ३० जानेवारीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदे यांचा मेळावा होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या वर्षा निवासस्थानी गुरुवारी शिवसेनेचे मंत्री, वरिष्ठ पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीतून शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यभरातील जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांशी संवाद साधला. वर्षा बंगल्यावरील बैठकीस राजेश क्षीरसागर हेदेखील उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. पहिले पाऊल आज जाहीर होत असलेले हे शिवसंकल्प अभियान आहे. कुठली जागा कुठला पक्ष लढवणार, उमेदवार कोण, जागा कोणाला सोडणार, यासारख्या अफवा समोरून पसरवल्या जात आहेत. त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपण आपल्या सर्व जागा ताकदीने लढवू या, जिंकू या. आपली महायुती विजयी करू या. वातावरण चांगले आहे, राज्यात झपाट्याने विकासकामे होत आहेत. केंद्राचे मजबूत पाठबळ आपल्या पाठीशी आहे. केलेल्या कामावर आपण मते मागू या.