मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचा निकाल बघूनच मुंबईला जावे, आमदार पी. एन. पाटील यांनी लगावला टोला
By विश्वास पाटील | Published: May 3, 2024 07:27 PM2024-05-03T19:27:14+5:302024-05-03T19:27:38+5:30
'मंडलिक-मुश्रीफ वादात कर्जमाफीचे शेतकऱ्यांचे ११२ कोटी परत गेले. तेच आता एक झाले'
यवलूज : कोल्हापुरातील वातावरण बघून दिल्ली, मुंबई कोल्हापुरात येऊन बसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीनदा येऊन गेले आज पुन्हा येत आहेत. त्यांनी आता दि. ४ जून पर्यंत कोल्हापुरातच राहून निकाल बघूनच मुंबईला जावे, असा टोला आमदार पी. एन. पाटील यांनी लगावला. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ यवलुज-पडळ येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी जयसिंग हिर्डेकर होते.
आमदार पाटील म्हणाले की, कोल्हापूरला पंतप्रधान मोदी येऊन गेले. अमित शाह आलेत. मुख्यमंत्री शिंदे तीनदा येऊन गेले आणि पुन्हा येत आहेत. कोल्हापुरातील वातावरण बघून त्यांना पराभवाची भीती वाटत आहे. म्हणूनच त्यांची चलबिचल झाली आहे. या शाहू महाराजांनी इथेच काय केले असे विचारत आहेत. यांनी काय केले ते येथील शेतकऱ्यांना गावकऱ्यांना माहित आहे. सर्वसामान्यांबद्दल त्यांना कळवळा आहे. मंडलिक-मुश्रीफ वादात येथील कर्जमाफीचे शेतकऱ्यांचे ११२ कोटी परत गेले. तेच आता एक झाले आहेत.
गेल्या दहा वर्षात काहीही विकासाची ठोस कामे झालेली नाहीत. भाजपचा फसवा विकास बाजूला फेकून देऊन आपल्याला शाश्वत विकास करायचा आहे. काहीजण मी सहज कोणाला भेटणार नाही, असा अपप्रचार करीत आहेत. पण मला थेट भेटण्यास, संपर्क करण्यास कसलीही अडचण येणार नाही. संपर्क कार्यालयाच्या माध्यमातूनही सर्वांची कामे होतील, अशी ग्वाही शाहू छत्रपती यांनी दिली.
यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके, बाळासाहेब खाडे, बाजीराव पाटील, दगडू भास्कर, दिनकर कांबळे, पडळच्या माजी सरपंच जयश्री राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, बाजार समिती सभापती भारत पाटील भुयेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.